महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्वीही अनेकदा नव्हता : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 07:33 PM2020-01-05T19:33:27+5:302020-01-05T19:34:34+5:30
प्रजासत्ताकदिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारण्यात आला. त्याबद्दल बाेलताना चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.
पिंपरी : ‘‘राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नसल्याने राजकारण सुरू आहे. आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. कशाचेही खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडले जात आहे. चित्ररथाचा विषय तांत्रिक आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ या पूवीर्ही अनेकदा नव्हता. कारण ते ‘रोटेशन’ पद्धतीने ठरवलं जातं. दरवर्षी तीस ते चाळीस टक्के राज्यांचे चित्ररथ येतात. यंदा तांत्रिकरित्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल रोटेशनमधून बाहेर पडले. बऱ्याच देशांचे प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहायला येत असतात, सगळ्या राज्याचे चित्ररथ कंटाळवाणे होऊ शकतात.’’ असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी - चिंचवड भाजप शहराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तत्पूर्वी पाटील पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कोणताही प्रयत्न भाजप करणार नाही. निसर्गाप्रमाणेच राजकारणाचेही संतुलन बिघडले आहे, आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनच भाजप काम करु. खातेवाटपांवर ते म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळ खातेवाटप झाल्याबाबत आनंद आहे. मंत्र्यांनी आता उत्तम काम करावीत. नागरिकांच्या अडचणी समजून मार्ग काढावा. विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाही. महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भाजप करणार नाही.’’
‘‘महाराष्ट्रात खूप प्रामाणिकपणाचं राजकारण व्हायचे, पण यावेळी काय झाले हे माहीत नाही. अवेळी पाऊस झाला, गारा पडल्या, त्या जशा अनाकलनीय आहे. तसेंच महाराष्ट्रातील राजकारण नागरिकांना अनाकलनीय आहे. मतदान करताना नागरिकांनी निराश न होता अधिक सतर्क राहिले पाहिजे. भाबडेपणाने मतदान करून चालणार नाही. निसर्गाप्रमाणेच राजकारणाचेही संतुलन बिघडले आहे. नागरिक आता अधिक विचारपूर्वक मतदान करतील. जातीचे, पैशांचे राजकारण संपणार आहे.’ असेही पाटील यावेळी म्हणाले.