रंग खेळत असलेल्या कामगाराच्या पाठीवर चॉपरसारख्या हत्याराने वार; निगडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:18 PM2021-03-31T14:18:23+5:302021-03-31T14:23:53+5:30
कामगार रंग खेळत होते त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला.
पिंपरी : रंग खेळत असलेल्या कामगारांच्या पाठीवर चॉपरसारख्या धारदार हत्याराने वार केला. तसेच दुसऱ्या प्रकरणात दारू पीत असल्याबाबत विचारणा केल्याने दगड मारून जखमी केले. दोन्ही प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओटास्कीम, निगडी येथे सोमवारी (दि. २९) हा प्रकार घडला.
पहिल्या प्रकरणात भीमा दत्ता कांबळे (वय २७, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर सुरेश हिरनाईक (वय २२), सविता सुरेश हेअर नाईक (वय ४०), देवकी सुरेश हिरा नाईक (वय १९, तिघेही रा. मिलिंद नगर, ओटास्किम, निगडी), अजय चौधरी, रोहित सोनवणे, राहुल, कुणाल, नीलबा (सर्वांचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कामगार रंग खेळत होते. त्या कारणावरून आरोपी भीमा कांबळे याने कामगार विकास गजभिव यांच्या पाठीवर लोखंडी चॉपरसारख्या धारदार हत्याराने वार केले. तसेच सागर गजभिव व अमोल पंचमुख यांच्याशी आरोपींनी झोंबाझोंबी केली. सागर याच्या तोंडावर दगड मारून शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी झालेली भांडणे सोडण्यासाठी फिर्यादी व त्यांचा भाऊ गेला असताना त्याच कारणावरून रात्री आठच्या सुमारास आरोपी दोन रिक्षांमधून आले. आरोपींनी संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी व त्यांचा भाऊ राकेश यांना लोखंडी चॉपर सारख्या धारदार हत्याराने व दगडांनी मारहाण करून जबर दुखापत केली.
दुसऱ्या प्रकरणात सविता सुरेश हिरीनाईक (वय ३९, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश कांबळे (वय २१), भीमा कांबळे (वय ३६), सागर गजभिव (वय २७), सुनील कांबळे (वय ४०), अनिल कांबळे (वय ४२, सर्व रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या घराशेजारी राहतात. आरोपी दारू पीत बसले होते त्यावेळी फिर्यादीने त्यांना त्याबाबत विचारणा केली असता आरोपींना राग आला. त्या रागातून त्यांनी दगड मारल्याने फिर्यादीचा मुलगा अमर याच्या डोक्याला जखम झाली. तसेच फिर्यादीचे पती व मुलगी देवकी यांना दगड मारल्याने मुका मार लागला आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.