सराफ बाजार बंदमुळे नागरिकांचा खोळंबा
By admin | Published: March 13, 2016 01:06 AM2016-03-13T01:06:38+5:302016-03-13T01:06:38+5:30
सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदनंतरही मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या १० दिवसांपासून सराफांच्या बंदमुळे लग्नसमारंभाकरिता सोने खरेदी करणाऱ्यांची
रहाटणी : सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदनंतरही मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या १० दिवसांपासून सराफांच्या बंदमुळे लग्नसमारंभाकरिता सोने खरेदी करणाऱ्यांची, गहाण ठेवणाऱ्यांची, तसेच दागिने बनविणाऱ्या कारागिरांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. सध्या विवाह शुभारंभाला सुरुवात झाली आहे, वर-वधू पक्षांच्या पित्यांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला असूनही सराफा बंदमुळे खरेदीचा खोळंबा झाला आहे. बंदमुळे कोटीचा व्यवहार ठप्प झाला आहे, तर सोने दुकानात काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या सगळीकडे लग्नसराईची धुम सुरू झाली आहे. केवळ एप्रिल महिन्यातच लग्नाचे मुहूर्त आहेत. अनेक जण लग्नापूर्वीच दागिने तयार करण्याकरिता आताच आॅर्डर देतात. तर अनेक जण घरातील जुने सोने मोडून आपल्या लेकीच्या लग्नाकरिता सोन्याचे दागिने घेतात. गेल्या १० दिवसांपासून सतत बंद असलेल्या बाजारामुळे अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. तसेच आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता साधारण नागरिक आपल्याकडील सोने, चांदी गहाण ठेवण्याकरिता बाजारात जात आहे.
मात्र, बंद बाजारामुळे अखेर त्यांना अवैध सावकारांच्या दारी जायची वेळ येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सराफ दुकान कडकडीत बंद असून, दररोज या दुकानांतून लाखोंची उलाढाल होते. मात्र, गेल्या १० दिवसांपासून बंद असलेल्या दुकानांमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झालेली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारासह अन्य बाजारातसुद्धा मंदीची लाट पसरलेली दिसत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. उन्हाळ्यात शाळेच्या सुट्यांमुळे विवाहाच्या तारखांना पसंती दिली जाते.
सुटीच्या नियोजनानुसार आधीपासून लग्नाची तयारी केलेल्या कुटुंबाची मात्र सध्या फसगत झाली आहे. ऐनवेळी किंवा विवाहाच्या आठ-दहा दिवस आधी दुकानात जाऊन दागिन्यांच्या खरेदीचे नियोजन करणाऱ्यांचे नियोजन फसले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक ग्राहक सराफ बाजारात येत आहेत, पण त्यांच्या पदरी निराशा येत आहे. सराफांची दुकाने उघडत नसल्याने खरेदी करायची कशी, अशा विवंचनेत अनेक कुटुंबे पडली आहेत.
(वार्ताहर)