नागरिक उदासीन, प्रशासनही ढिम्म

By Admin | Published: April 24, 2017 04:46 AM2017-04-24T04:46:30+5:302017-04-24T04:46:30+5:30

इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर

Citizen down | नागरिक उदासीन, प्रशासनही ढिम्म

नागरिक उदासीन, प्रशासनही ढिम्म

googlenewsNext

शशिकांत जाधव / तळवडे
इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर या दोन्ही तीर्थक्षेत्रांची वारी करणारे वारकरी पवित्र अशा इंद्रायणी नदीत स्नान करून धन्य होत असतात. नदीला भारतीय संस्कृतीत मातेसमान मानले जाते. माता लेकराचे अपराध पोटात घालते. त्यामुळेच की नदी प्रदूषण वाढविण्यात मानव कशाचीही कसर ठेवत नाही. इंद्रायणीच्याही उदरात सर्रास कचरा टाकला जातो. सांडपाणी सोडले जात आहे.
तळवडे येथे इंद्रायणी नदीवर बंधारा घालून साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येतो. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. या बंधाऱ्यातून सतत पाण्याचा निचरा होत असल्याने इंद्रायणीची एक धार बाराही महिने सुरू असते. इंद्रायणीवर निघोजे ते तळवडे असा पूल उभारल्यामुळे येथून होणारे दळणवळण वाढले आहे. याच पुलाच्या जवळून थेट इंद्रायणी पात्रात वाहने उतरत असतात आणि बाराही महिने येथील नदीपात्रात बिनदिक्कतपणे वाहने धुतली जात असतात, सुमारे दोनशे ते अडीचशे वाहने दिवसभरात येथे धुतली जात असावीत, यामध्ये छोट्या-मोठ्या बस, कार, टेम्पो, ट्रक आणि कंटेनर्स आदी सर्व प्रकारची वाहने थेट नदीच्या पाण्यात धुतल्याने यातील सांडणारे आॅईल, पेट्रोल आदी रासायनिक पदार्थ, तसेच माती, कपडे, वाहनातील टाकाऊ पदार्थांमुळे पाण्याच्या प्रदूषणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे.
इंद्रायणी परिसरातही खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असतो. जाणारे-येणारे प्रवासी घरगुती कचरा परिसरात टाकत असतात. परिसरातील हॉटेलमध्ये उरलेले शिळे अन्न, लघुउद्योगात तयार होणारा टाकाऊ कचरा, निर्माल्य आदी प्रकारचा कचरा सातत्याने टाकला जात असतो. लघुउद्योगातील कचरा बऱ्याच वेळा वाहनात भरून नदी परिसरात आणून टाकला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. यामुळे येथील निसर्गरम्य परिसराचे रूपांतर कचऱ्याच्या मैदानात होऊ पाहत आहे.
गणेशोत्सव, तसेच दुर्गोत्सव आदी काळात खूप मोठ्या प्रामाणात मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. याच काळात निर्माल्यही मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येत असतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.

Web Title: Citizen down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.