उकाड्याने नागरिक हैराण
By admin | Published: May 9, 2017 03:40 AM2017-05-09T03:40:02+5:302017-05-09T03:40:02+5:30
तळेगाव शहर परिसरात नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले असून, पाऊस पडून हवेतील उष्मा कमी केव्हा होईल, याची सर्वजण वाट पाहत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : तळेगाव शहर परिसरात नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले असून, पाऊस पडून हवेतील उष्मा कमी केव्हा होईल, याची सर्वजण वाट पाहत आहेत.
भूगर्भातील पाण्याची पातळीही खोल गेली आहे. तालुक्यातील ओढे, नाले आटले आहेत. पाण्याची पातळी कमालीची खाली गेल्यामुळे हातपंपांना पाणी लवकर येत नाही. या वाढत्या उकाड्याने शहरातील रसवंतीगृहाकडे सर्वसामान्यांचा ओढा वाढला आहे. विजेच्या लपंडावामुळे रसवंतीगृह चालकांना लोकांची वाढती मागणी भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शीतपेयांच्या दुकानात गर्दी दिसते. थंड पेयापेक्षा सर्वसामान्य माणसांना काकडी परवडणारी असली, तरी तिचे भाव अजूनही तेजीत आहेत. गोरगरीब मजूर व वाटसरूंसाठी काही सेवाभावी संस्थांतर्फे पाणपोई सुरू आहे. कुंभारवाड्यात मातीचा माठ अजूनही विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या वर्षी माठाचा विक्रमी खप झाल्याची माहिती सुरेश कुंभार यांनी दिली. नागरिक माठात पाणी भरून थंड पाण्याची तहान भागवतात.