नागरिकांनो सावधान! तुम्ही घेताय ती निरा असू शकते आंबलेली? विक्रेते म्हणतात आम्हाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:51 PM2022-05-24T18:51:29+5:302022-05-24T18:51:39+5:30

काही तासानंतर निरेतील नैसर्गिक जीवनसत्व नष्ट होऊन त्यात अम्ल, अल्कोहोल असे नशा आणणारे घटक वाढतात

Citizens beware the neera you drink may be unclean | नागरिकांनो सावधान! तुम्ही घेताय ती निरा असू शकते आंबलेली? विक्रेते म्हणतात आम्हाला...

नागरिकांनो सावधान! तुम्ही घेताय ती निरा असू शकते आंबलेली? विक्रेते म्हणतात आम्हाला...

googlenewsNext

नारायण बडगुजर

पिंपरी : नीरा आरोग्यवर्धक असल्याचे सांगत त्याची विक्री होते. मात्र, निरेची शुद्धता तपासण्याची सामुग्री किंवा सुविधा विक्रेते किंवा ग्राहकांकडेही नसते. आंबण्याची प्रक्रिया होत असलेल्या निरेची विक्री होताना काही ठिकाणी दिसून येते. अशा निरेतील नैसर्गिक जीवनसत्व नष्ट होऊन त्यात अम्ल, अल्कोहोल असे नशा आणणारे घटक वाढतात. ते आरोग्यास घातक ठरू शकतात. अशा निरेच्या विक्रीतून सामान्य ग्राहकांची लूट होत आहे.
  
भर उन्हात थकवा दूर करण्यासाठी तसेच उष्णतेपासून बचावासाठी नागरिक निरेला पसंती देतात. शहरातील रस्त्यांवर पिवळ्या आणि गुलाबी टपऱ्यांमधून निरेची विक्री होते. या केंद्रांमशील मोठमोठ्या फलकांवर निरेचे फायदे ठळकपणे नमूद केलेले असतात. मात्र, त्यातील अम्ल, अल्कोहोल आदींचे प्रमाण किती, त्याची शुद्धता कशी तपासायची, किती तासांनंतर किंवा कशामुळे निरेची आंबण्याची प्रक्रिया सुरू होते? याबाबत विक्रेत्यांनाही माहिती नसल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले.
 
विक्रेत्यांमध्ये परप्रांतीय जास्त

निरेच्या विक्रेत्यांमध्ये परप्रांतीय जास्त आहेत. त्यांच्या केंद्रावर दररोज कॅनमधून निरेचा पुरवठा केला जातो. त्याला एका डब्यात ओतून डब्याभोवती बर्फ ठेवला जातो. त्यामुळे ते थंड राहण्यास मदत होते. मात्र, या निरेचा पुरवठा कोणत्या भागातून होतो याबाबत विक्रेते अनभिज्ञ असतात. आमच्या पुरवठादाराला याबाबत माहिती असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. निरेच्या विक्रीची काही संस्थांना परवानगी दिली आहे. त्यांच्याकडून ठिकठिकाणी टपऱ्या सुरू करून निरेची विक्री होते. काही व्यावसायिक निरेच्या शुद्धतेबाबत खबरदारी घेतात.
 
उन्हात आंबण्याची प्रक्रिया जलद

माडी, ताडी, शिंदी, खजुरी, अशा काही झाडांवरून नैसर्गिक द्रव काढला जातो. अशा झाडांवरून निरेलाही काढले जाते. मात्र काही तासच ती पिण्यायोग्य असते. त्यानंतर नीरा आंबायला सुरुवात होते. उन्हाचा चटका वाढल्याने निरेच्या आंबण्याची प्रक्रिया जलद होते.    

अल्कोहोलचे वाढते प्रमाण

शुद्ध निरेत नैसर्गिक साखर आणि जीवनसत्व असतात. ताडीत चार ते पाच टक्के अल्कोहोल असू शकते. उन्हामुळे निरा आंबून त्यात अल्कोहोलचे प्रमाण वाढून ते चार ते पाच टक्के होऊ शकते.  

 शुद्धतेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना विक्रेत्यांना केल्या आहेत

निरेच्या शुद्धतेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना विक्रेत्यांना केल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विक्री केंद्रांची पाहणी केली जाते. विसंगती आढळून आल्यास कारवाई केली जाते असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले. 

Web Title: Citizens beware the neera you drink may be unclean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.