थेरगाव परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:23 AM2019-01-09T00:23:14+5:302019-01-09T00:23:37+5:30
थेरगाव : दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी थेरगाव परिसरातील महत्त्वाचे रस्ते, वर्दळीची ठिकाणे, चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिक करू लागले ...
थेरगाव : दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी थेरगाव परिसरातील महत्त्वाचे रस्ते, वर्दळीची ठिकाणे, चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. थेरगाव परिसरात वाढत्या वाहन चोरीच्या, पेट्रोल चोरीच्या घटना, टवाळखोर पोरांचा वावर, मुलींची छेडछाड आदी गुन्हे वाढू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील बगीचे, मैदाने, महत्त्वाचे चौक, वर्दळीचे रस्ते, शाळा- महाविद्यालयांच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्ह्यांवर नियंत्रण येऊ शकते. तसेच सीसीटीव्ही बसविल्यास परिसरातील गुन्हे रोखण्यास व आरोपी शोधण्यास पोलिसांनाही मदत होईल. यासाठी प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
गेल्या अनेक दिवसांत वाहन चोरीच्या, अंधश्रद्धेतून गुन्हे, पेट्रोल चोरीच्या, भांडणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील पोलिसांचा वचक कमी झाला आहे, असे नागरिकांना वाटू लागले आहे. वर्षभरात थेरगाव परिसरात गुन्हेगारीच्या विविध घटना घडल्यानंतर हे गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे थेरगाव परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे.