आयटीनगरीत असूनही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित; सत्तेतील कारभा-यांचा विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 05:22 AM2018-02-15T05:22:23+5:302018-02-15T05:22:43+5:30
हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
वाकड : हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मात्र, महापालिकेची नियमावली, मिळकतकर आकारणी, वाढती पाणीपट्टी या विषयीची भीती ग्रामस्थांना असल्याने समावेशाविषयी त्यांची संभ्रमावस्था आहे.
युती सरकारच्या काळात १९९५ ला हिंजवडी परिसरात आयटी पार्क वसविण्याची घोषणा झाली. मात्र या आयटी पार्कला १९९९-२००० मध्ये चालना मिळाली. ही जमेची बाजू आहे; मात्र गाव महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खो बसून बकालपणा अधिक वाढणार आहे. त्यामुळे हिंजवडीचा पालिका हद्दीत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.
हिंजवडी आणि परिसरात आयटी पार्कचा विस्तार झाल्यानंतर देशाच्या कानाकोपºयातून रोजगारासाठी लाखोंच्या संख्येने लोक येथे दाखल झाले आहेत. ८३३ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या हिंजवडी गावाची मागील जनगणनेनुसार ११,४५९ लोकसंख्या आहे; प्रत्यक्षात ५० हजारांहून अधिक येथील लोकसंख्या आहे. एका बाजूला भव्य-दिव्य, पंचतारांकित कंपन्यांचा झगमगाट असा आयटी पार्क आणि दुसºया बाजूला
सर्वत्र अनधिकृत बांधकामांनी वेढल्याने गावाला आलेले बकालपण या दोन बाजू अशी सद्य:स्थिती हिंजवडीची आहे.
गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यास सुविधा होतील, हे जरी खरे असले, तरी आमची ग्रामपंचायत देखील नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम आहे. यापूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचा महापालिकेने विकास साधला नाही. त्यामुळे नागरिकांत नकारात्मकता आहे. महापालिका हद्दीत समावेश करण्याऐवजी हिंजवडी-माण व अन्य गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेची स्थापना करावी.
- रोहिणी साखरे, माजी सरपंच, हिंजवडी
हिंजवडी गावाची लोकसंख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे गावाचा महापालिका हद्दीत समावेश होणार ही स्वागतार्ह बाब आहे. गाव समाविष्ट झाल्यास सर्व समस्या सुटून चांगल्या नागरी सुविधा पुरविल्या जातील. सेवा, सुविधाही मिळतील. विकास आराखड्यानुसार गावात सर्व सुखसुविधा मिळतील. त्यामुळे गावाचा महापालिका हद्दीत समावेश गरजेचा आहे.
- राहुल जांभूळकर, माजी उपसरपंच, हिंजवडी
वस्तुस्थिती नाकारता येत नाही. विकास होण्यासाठी महापालिकेची आवश्यकताच आहे. त्यामुळे महापालिकेने ही गावे समाविष्ट करावीत; मात्र गाव समाविष्ट करून विकास आराखड्याची त्वरित अंमलबजावणी करता येत नसेल, तर पाच गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेला मान्यता द्यावी. जेणेकरून स्वतंत्ररित्या राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने सर्वांगीण विकास साधता येईल. महापालिकेतील समावेशामुळे अनेक समस्या सुटतील आणि विकास होईल. - श्याम हुलावळे,
माजी सरपंच, हिंजवडी