व्हायरल फिव्हरने नागरिकांच्या डोक्याला ताप; डॉक्टर म्हणतात, करा 'हे' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:34 AM2023-04-05T10:34:31+5:302023-04-05T10:35:17+5:30
वातावरणामध्ये झालेल्या या बदलामुळे शहरामध्ये व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उष्णतेच्या झळा सुरू झाल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. अशीच स्थिती राहिल्यास एप्रिल व मे महिन्यामध्ये आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामानातील झालेल्या या बदलामुळे व्हायरल तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरामध्ये सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसह महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. भर उन्हाळ्यात व्हायरल फिव्हरने नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढवला आहे.
मार्च कूल तर एप्रिल त्रासदायक
२०२२ मध्येही मार्च महिन्यातील तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले. त्यावेळी मानव व पशुप्राण्यांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागला. यंदा मार्च महिना काही प्रमाणात कूल राहिला असला तरी एप्रिलमध्ये उष्णतेच्या झळांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्दी, तापाने बेजार
वातावरणात अचानक बदल झाला की, मानवाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात. गतवर्षी हा अनुभव अनेकांना आला. यंदाही असा त्रास अनेकांना जाणवू लागला आहे. वातावरणामध्ये झालेल्या या बदलामुळे शहरामध्ये व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या वेळी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच बाहेर जाण्याची वेळ आली तर त्वचा झाकावी. तसेच डोळ्यांसाठी चांगल्या दर्जाचा चष्मा वापरावा. भरपूर पाणी व नैसर्गिक थंड पेय प्यावे. व्हायरल फिव्हरची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या मनपा रुग्णालयामध्ये तपासणी करून घ्यावी. - डॉ. अभयचंद्र दादेवार, प्रमुख, थेरगाव रुग्णालय