विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
By admin | Published: June 8, 2015 05:29 AM2015-06-08T05:29:03+5:302015-06-08T05:29:03+5:30
श्रीनगर, तापकीरनगर, काळेवाडी भागात विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे रहिवासी हैराण असल्याची तक्रार नगरसेविका अनिता तापकीर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी : श्रीनगर, तापकीरनगर, काळेवाडी भागात विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे रहिवासी हैराण असल्याची तक्रार नगरसेविका अनिता तापकीर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परिसरात अनेक ठिकाणी विद्युततारा लोंबकळत असून, त्या तुटून अनेक अपघात झाले आहेत. तारांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. तापकीरनगर परिसरातील काही भागात अर्धवट परिस्थितीत भूमिगत केबल टाकण्याचे काम झाले आहे. गारमळा कॉलनी, मथुरा कॉलनी, अमरदीप कॉलनी, गुलमोहर कॉलनी, सुयोग कॉलनी, यशोदा कॉलनी, शास्त्रीनगर, गजानननगर, गुरुदत्त हौसिंग सोसायटी या भागात आठ-दहा दिवसांपासून विद्युतपुरवठा सतत खंडित होत आहे. या ठिकाणच्या विद्युततारा जीर्ण झालेल्या असल्याने केव्हाही तुटून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
भूमिगत केबलची अर्धवट कामे पूर्ण करावीत. रात्री पथदिवे सुरू नसल्याने व उन्हाळी सुटीमुळे अनेक नागरिक गावी गेल्याने रात्री चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.विजेच्या तक्रारी सोडविण्यात याव्यात.
डीपी बॉक्स गंजलेले असून, अनेक बॉक्स तुटून पडले आहेत. काही बॉक्सला झाकणेदेखील नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गाड्या धडकून काही ठिकाणी रस्त्यात असलेले बॉक्स वाकडे झाले आहेत. भूमिगत केबल टाकून व्यवस्थित वीजपुरवठा करण्यात यावा अन्यथा महिला बचत गट, सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह आंदोलन करण्यात येईल, असे तापकीर यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)