नागरिकांवर गुन्हेगारांची दहशत; उद्योगनगरीला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:35 AM2018-01-10T03:35:00+5:302018-01-10T03:35:08+5:30
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न सरकार दरबारी भिजत पडल्याने शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या आठवडाभरात विविध भागात रस्त्यांवर उभी असणारे वाहने अज्ञान टोळक्यांकडून फोडण्याच्या घटना घडत आहेत.
पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न सरकार दरबारी भिजत पडल्याने शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या आठवडाभरात विविध भागात रस्त्यांवर उभी असणारे वाहने अज्ञान टोळक्यांकडून फोडण्याच्या घटना घडत आहेत. शहरात गुंडांची दहशत असून, ती मोडून काढण्यात पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे उद्योगनगरीतील नागरिकांना गुन्हेगारांच्या दहशतीखाली रहावे लागत आहे.
राज्यात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत गेल्या काही कालखंडापासून गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. त्यात विनाकारण वाहने फोडून दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. संत तुकारामनगर आणि थेरगाव भागातील वाहने फोडण्याचे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान मोहनगर येथील रामनगरमधील सैनिक वसाहतीतील परिसरात टोळक्याने सहा गाड्यांची तोडफोड करून घरांच्या काचाही फोडण्यात आल्या. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
सागर दत्तू नलावडे (वय २१, रा. रामनगर), सागर गणेश भिसे (वय १९, रा. दत्तनगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, विनोद राकेश पवार, पवन विष्णू लष्करे, सूरज गायकवाड, अजय विश्वनाथ ओव्हाळ, वैभव ओव्हाळ, सागर सातकर, अभिषेक गाणगाव, निसार शेख, युवराज माने (सर्व रा. चिंचवड) हे फरार आहेत. याप्रकरणी अण्णासाहेब माधवराव शिरसाट (वय ६०, रा. रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहननगर परिसरात काल रात्री टोळक्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सहा वाहनांची तोडफोड केली. या टोळक्याने तलवार, लाठ्या आणि सिमेंटच्या गट्टूच्या साहाय्याने वाहनांची तोडफोड केली.
यामध्ये सुमारे १० ते १५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. फिर्यादीकडील अडीच हजार रुपये या टोळक्याने तलवारीच्या धाकाने काढून घेतले. गेल्या आठ दिवसांपासून शहरात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न पुन्हा चर्चेत
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचा विकास वेगाने होत असल्याने नागरीकरणही वाढले आहे. नागरीकरणाबरोबरच गुन्हेगारीही वाढली आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. परिमंडळ तीन अंतर्गत पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे कामकाज चालविले जाते. नागरीकरणाच्या तुलनेत पोलीस कर्मचाºयांची संख्याही कमी आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा दर्जा मिळाल्यास कर्मचारी संख्या पुरेशी मिळेल, गुन्हेगारी कमी करणे पोलिसांना शक्य होईल, म्हणून पोलीस आयुक्तालय सुरू होणे गरजेचे आहे. विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि गौतम चाबुकस्वार यांनीही प्रश्न विचारला होता. पोलीस आयुक्तालयास मंजुरी मिळालेली असली, तरी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर सरकारच्या वतीने देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनाही साकडे
किवळे येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी येणार आहेत. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत उपाययोजना कराव्यात, स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावावा, लवकरात लवकर आयुक्तालय सुरू व्हावे, यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांच्या, तसेच विविध संस्थांच्या वतीने केली जाणार आहे.
तरुणांमध्ये तोडफोडीचे नवीन फॅड
शहराचे नागरीकरण वाढल्याने वाहनांची संख्याही वाढली आहे. रात्रीच्या वेळी नागरिक पार्किंगची सोय नसल्याने घरासमोरील रस्त्याला वाहने लावतात. रस्त्यावरील वाहने फोडण्याचे नवीन फॅड आले आहे. आठवड्यात ही दुसरी घटना आहे. पिंपरीत गाड्या फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. तोडफोड करण्यासाठी गुन्हेगार सिमेंटचे ब्लॉक, घन वापरत असल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच हातात तलवारी घेऊन दहशत पसरविली जात आहे.
गेल्या २४ तासांत २३ वाहनांची तोडफोड केली आहे. एका प्रकरणात पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.