नागरिकांना कीव; पण प्रशासन निगरगठ्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:12 AM2018-08-21T02:12:33+5:302018-08-21T02:12:57+5:30
देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजविले; अधिकाऱ्यांची मात्र डोळेझाक
देहूगाव : अपघातस्थळ आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या देहू-आळंदी रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या श्रमदान व आर्थिक सहकार्यातून झाले. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन व पिंपरी-चिंचवड महापालिकेने डोळेझाक केल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
पालखी प्रस्थानापूर्वी दोन दिवस अगोदर बुजविण्यात आलेले खड्डे पावसामुळे पुन्हा अवघ्या काही दिवसांतच उखडल्याने मृत्यूचा सापळा व अपघातस्थळ बनलेला आहे. या रस्त्याने नियमित येणाºया वाहनचालकांना वाहन जीव मुठीत धरून चालवावे लागत होते. ग्रामपंचायतीने हा रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे वर्ग केला असल्याने या रस्त्यावर त्यांना खर्च करणे प्रशासकीय दृष्ट्या अडचणीने असल्याचे सांगत रस्त्याचे खड्डे बुजविणे टाळले जात आहे. तर पिंपरी-चिंचवड पालिकेने देखील हा रस्ता वारंवार दुरुस्त केला आहे. या रस्त्याची खरी अडचण आहे, ती या राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या रस्त्याची दुरुस्ती-देखभाल खर्च किती करायचा, रस्त्यासाठी पालिकेने निधीही मंजूर केला आहे. मात्र, तो खर्च करण्याचे टाळत असल्याचे लक्षात येत आहे. याशिवाय या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न भूसंपादनामुळे भिजत पडलेला आहे. यासाठी सक्षम अधिकारी आवश्यक आहे. येथील शेतकरी रस्ता करण्यास सहकार्य करीत आहेत. मात्र कोणाच्या तरी चुकीच्या मार्गदर्शनाखाली किंवा सांगण्यावरून ते अधिकारी टाळाटाळ करीत असल्याची दबक्या आवाजात गावात चर्चा आहे. तर गावातील पदाधिकारी कामाचे श्रेय घेण्यासाठीच केवळ पत्रव्यवहाराचा खटाटोप करीत असल्याचीही चर्चा आहे.
तरुणांनी केले श्रमदान
प्रशासनाच्या असहकाराला कंटाळून गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन सक्षम लोकांच्या सहकार्यातून आपणच रस्त्याचे खड्डे बुजवायचे असा निर्णय झाला. यानुसार सकाळपासून देहूगाव शिवसेनाप्रमुख सुनील हगवणे, श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे विश्वस्त अभिजित मोरे, शांताराम हगवणे यांनी वीटभट्टीचे रॅबिट व विटांचा चुरा रस्त्यावर टाकून त्याला समतल करण्याचे काम सुरू करण्यात आले. महेश मोरे, रामकुमार आगरवाल यांच्यासह काही तरुणांनी श्रमदान केले.