घरे रिकामी करण्यास नागरिकांकडून सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:51 AM2018-01-04T02:51:17+5:302018-01-04T02:51:28+5:30
रावेत ते वाल्हेकरवाडी मार्गावरील बाधित घरांच्या घरमालकांनी नोटिशीनुसार सकाळपासूनच घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. घरे खाली करण्यास दोन दिवसांची मुदत राहिल्याने राहत्या घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याची लगबग सुरू होती.
रावेत - रावेत ते वाल्हेकरवाडी मार्गावरील बाधित घरांच्या घरमालकांनी नोटिशीनुसार सकाळपासूनच घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. घरे खाली करण्यास दोन दिवसांची मुदत राहिल्याने राहत्या घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याची लगबग सुरू होती. तर घरावर असणारे पत्रे, कौल सुरक्षित काढण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू होते.
रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहापदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतचे काम अर्धवट आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली असून, त्याकरिता आवश्यक जागेचे संपादन करण्यासाठी वाल्हेकरवाडी येथील सर्व्हे क्रमांक ११५ ते १२१ मधील ७४ घरांना प्राधिकरणाने खाली करण्याची अंतिम नोटीस दिली आहे. अडथळा ठरत असलेल्या घरावर प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने सर्वे क्र. १२० आणि १२१ मधील बाधित घरांना लाल मार्किंग केली आहे. या अनुषंगाने पाच पक्की घरे आणि ६९ तात्पुरत्या स्वरूपातील पत्रा व कौलारू घरे काढून टाकण्यात येणार आहेत. चिंचवड जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडीमधून जात असून, या रस्त्याचे काम आजही अपूर्णच आहे. हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरुवात होऊन पुढे औंधमार्गे येणारा बीआरटी रस्ता रावेत येथे मिळतो. पुण्यावरून मुंबईकडे जाणाºया लोकांसाठी हा मधला मार्ग असून, या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचते. पण या रस्त्याचे काम असे अर्धवट अवस्थेत आहे. नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील रस्त्याच्या कामाला ३१ डिसेंबर २०१४ रोजी सुरुवात झाली होती.
नागरिकांचा कंठ आला दाटून
पिढ्यान्पिढ्या ज्या घरात वास्तव्य केले ते घर खाली करताना नागरिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले होते. विशेषत: महिलावर्गाला गहिवरून आले होते. आनंदाचे आणि दु:खाचे अनेक क्षण या वास्तूमध्ये पिढ्यान्पिढ्या घालविले आहेत. ते राहते घर सोडताना आबालवृद्धांसह इतर नागरिकांनाही गहिवरून आले होते. सर्व्हे क्रमांक ११५ ते १२१ मधील ७४ घरे पूर्णपणे पाडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाधित होणाºया घरांना प्राधिकरणाने नुकतीच अंतिम नोटीस बजावली असून, त्याद्वारे ५ जानेवारीच्या आत घर रिकामे करण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने बाधित नागरिक स्वत: राहते घर रिकामे करीत होते.
पाच जानेवारीला कारवाई
अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करण्यात येणार असून ५ जानेवारीला अंतिम नोटीस देण्यात आलेल्या आणि लाल खुणा केलेल्या घरांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई होणार आहे. त्यानंतर या कामासाठी आवश्यक निधी प्राधिकरण महापालिकेला हस्तांतरित करणार असून, निविदा काढल्यानंतर दोन महिन्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.