पिंपरीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांनीच केले नियम पाळण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:33 PM2020-04-20T15:33:58+5:302020-04-20T15:34:43+5:30
लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमा बंद
पिंपरी : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ९८ जणांवर सांगवी पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यात ९२ जणांना ताकीद व समज देण्यात आली. तर तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करा, घराबाहेर पडू नका, असा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या जवळच्या पाच व्यक्ती किंवा व्हॉटस अॅपवरून पाच ग्रुपमध्ये फॉरवर्ड करून या ९८ जणांकडून पोलिसांनी जनजागृती करून घेतली.
लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच शहरात संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा नागरिकांवर व वाहनचालक तसेच मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्यांवर कारवाई करण्यात आली.
सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर रस्त्यावर या नागरिकांना बसविण्यात आले होते. काही जणांना व्यायाम करायला सांगितले. या नागरिकांना समज देण्यात आली. तसेच त्यांच्याकडूनच पोलिसांनी जनजागृती करणारे मेसेज पोस्ट करून घेतले. या अनोख्या पद्धतीने केलेल्या जनजागृती बाबत चर्चा होत आहे.