शहरातील एटीएम सुरक्षा रामभरोसे
By admin | Published: November 30, 2015 01:49 AM2015-11-30T01:49:57+5:302015-11-30T01:49:57+5:30
पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये भरदिवसा बँक परिसरामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतरही बँका सुरक्षेबाबत निष्क्रिय असल्याचे चित्र शनिवारी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये भरदिवसा बँक परिसरामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतरही बँका सुरक्षेबाबत निष्क्रिय असल्याचे चित्र शनिवारी रात्री ‘लोकमत’ टीमने केलेल्या पाहणीमध्ये दिसून आले. अनेक एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक नव्हते. काही केंद्रावरील सुरक्षारक्षक झोपले असल्याचे उघडकीस आली.
सुरक्षारक्षकाविनाच एटीएम
तळवडे : तळवडे ते त्रिवेणीनगर या मुख्य रस्त्यावर विविध बँकांची १२ एटीएम केंद्रे असून, या परिसरातील एकाही केंद्रावर रात्रीच्या वेळेत सुरक्षारक्षक नसल्याचे आढळले.
त्रिवेणीनगर परिसरात शेजारी शेजारीच अॅक्सिस, स्टेट बॅँक अॉफ इंडिया, एच.डी.एफ.सी.अशा चार बॅँकांची ए.टी.एम केंद्र आहेत, पण या चारही केंद्रावर सुरक्षारक्षक नसल्याचे आढळून आले आहे.
साठीत सुरक्षेची काठी
दुर्गानगर चौकात एचडीएफसी बॅँकेचे एटीएम असून, या केंद्रावर वयाची साठी पार केलेल्या वयोवृद्ध सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे सुरक्षेसाठी काठीही आढळली नाही.
निगडीतही भेळ चौकात एचडीएफसी बॅँकेच्या एटीएम केंद्रावर आणि लोकमान्य रुग्णालय परिसरात सेंट्रल बॅँक अॉफ इंडिया, बॅँक अॉफ महाराष्ट्र या बॅँकाच्या ए.टी.एम. केंद्रावर सुरक्षारक्षक नव्हते.
कुत्र्यांवर सुरक्षेचा भार
पिंपळे गुरव : काटेपुरम चौकामध्ये दोन एटीएम केंद्रे आहेत. त्यामध्ये आयसीसी बँकेच्या एटीएमसमोर एक कुत्रा सुस्तावलेला होता. १० वाजून २० मिनिटांनी एचडीएफसी बँकेच्या एटीएमसमोर फक्त रिकामी खुर्ची आढळून आली. १० वाजून ३० मिनिटांनी नवी सांगवीतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये सुरक्षारक्षकाचा पत्ता नव्हता. १० वाजून ३५ मिनिटांनी जुनी सांगवीतील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमसमोर हीच परिस्थिती दिसून आली.
रावेत : परिसरातील भोंडवे कॉर्नर, डी.वाय.पाटील महाविद्यालय मार्ग, आकुर्डी रेल्वे स्थानक, बिजलीनगर, म्हाळसाकांत चौक, संभाजी चौक, चिंतामणी चौक, वाल्हेकर वाडी चिंचवड मार्ग, गुरुद्वारा चौक आदी ठिकाणी ३७ एटीएम केंद्र आहेत .त्या पैकीच चारच ठिकाणी सुरक्षा रक्षक असल्याचे आढळले.
रावेत प्राधिकरणातील भोंडवे कॉर्नर येथे रात्री १०.४० वाजता कॅश नाही असा फलक एटीएमवर लावण्यात आला होता आणि सुरक्षारक्षकही नव्हता. डॉ डी. वाय. पाटील कॉलेज मार्गावर चार बॅँकावर सुरक्षारक्षक नसल्याचे आढळले.
बिजलीनगर परिसरातील येथील सावित्राई व्यापार संकुलात सलग विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ एटीएम केंद्रे आहेत. सुरक्षारक्षकाचा अभाव दिसून आला.
चोरीनंतरही जैसे थे परिस्थितीकाळेवाडी : येथील सुभाषचंद्र बोस चौकातील अॅक्सिस बँकेचे, महापालिकेच्या शाळेजवळील स्टेट बॅक, तसेच काळेवाडी पंपरी रस्त्यावरील इतर एटीएमवर रात्री ११ ते १ या कालावधीत अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक दिसून आला नाही. मागील काही दिवसापूर्वी सुभाषचंद्र बोस चौकातील एटीएम शेजारील दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी काही मालाचीही चोरी केली होती. तसेच इतर दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला होता. एटीएमची सुरक्षाही धोक्यात असून परिसरातील एटीएम वर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणीही या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
वाकड : शिव कॉलनी वाकड रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम केंद्रावर तीन मशीन असूनही येथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही इथून पुढे काही अंतरावर एचडीएफसी व यस बँकेचे एटीएम केंद्र होते मात्र यावरही सुरक्षारक्षकाचा थांगपत्ता नव्हता. रात्री साडेअकरा वाजता भोईर इस्टेट येथील स्टेट बँकेचे आणि यानंतर मंगलनगर वाकड रस्त्यावरील एटीएम केंद्रातील सुरक्षारक्षक गप्पा मारत बसलेला आढळला. मात्र याकडे कुठलेही साधने नव्हती. यानंतर पावणेबाराच्या सुमारास डांगे चौकातील चारपैकी एकाही एटीएमवर सुरक्षारक्षक दिसला नाही.
भोसरी : रात्री साडेदहा ते साडे बारापर्यंत भोसरीत लांडेवाडी, भोसरी उड्डाणपूल परिसर, आळंदी रस्ता व चांदणी चौक ते लांडेवाडी, धावडेवस्ती, दिघी रोड या परिसरातील एटीएम केंद्राची पाहणी केली. रात्रीच्या वेळेस सुरक्षारक्षकच नसल्याची बाब उघडकीस आली. भोसरी उड्डाणपूल परिसरातील एक्सिस बँक व स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम सताड उघडे होते. लांडेवाडी येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम सोडले, तर या रस्त्याला असणाऱ्या चार ते पाच एटीएममध्ये सुरक्षारक्षकच नव्हते. या सर्व प्रकारामुळे एटीएम केंद्राची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पुढे येत आहे. चिंचवड : आयडीबीआय एटीएममध्ये सुरक्षा
रामभरोसे होती. सीडीएम एटीएममध्ये सुरक्षारक्षक होता. परंतु तो झोपला होता. अॅक्सिस व एचडीएफसी बँकेच्या एटीएममधेही सुरक्षारक्षक नव्हते. अहिंसा चौकातील क्लिक एटीएममध्ये सुरक्षारक्षक झोपत होता.या भागात पाच एटीएम केंद्र आहेत, मात्र येथे सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसले. १२:५५ चिंचवडगावातील चापेकर उड्डाण पुलालगत असणाऱ्या ई सुविधा एटीएम केंद्राबाहेर एक वयस्कर सुरक्षारक्षक तैनात होता; परंतु त्याच्याकडे सुरक्षेची कोणतीही साधने नव्हती.