शहरवासीयांना आस पालखी रिंगण सोहळ्याची
By admin | Published: July 7, 2015 04:18 AM2015-07-07T04:18:33+5:302015-07-07T04:18:33+5:30
चार वर्षांपूर्वी श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नेत्रदीपक आणि भव्य असा रिंगण सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा या सोहळ्याचा योग कधी येणार
पिंपरी : चार वर्षांपूर्वी श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नेत्रदीपक आणि भव्य असा रिंगण सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा या सोहळ्याचा योग कधी येणार, याची आस लागली आहे. वाढीव तिथी आल्यानंतरच संस्थान पिंपरीत रिंगण सोहळा घेत असते. मात्र, हा योग दर वर्षी यावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
आषाढी वारीतील रिंगणसोहळा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. दिवसभराच्या प्रवासानंतर थकलेल्या भाविकांचा उत्साह वाढविण्यासाठी रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते. गोल व उभे असे रिंगणाचे दोन प्रकार आहेत. देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर एकूण सहा रिंगण होतात. गोल रिंगणात सर्वप्रथम दोन्ही अश्व पालखी रथासोबत रिंगणात प्रदक्षिणा करून मध्यभागी येतात. पालखी रथातून उतरवून मध्यभागी ठेवली जाते. त्यानंतर टाळकरी, झेंडेकरी, तुळशी घेतलेल्या महिला, वीणेकरी रिंगण घालतात. त्यानंतर अश्वांचे रिंगण पार पडते. रिंगणात धावणारे अश्व पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते.
देहूतून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिले गोल रिंगण सणसरजवळील बेलवडी येथे पार पडते. पुणे-पिंपरी-चिंचवड शहरापासून बेलवडीचे अंतर सुमारे शंभर किलोमीटर आहे. शहरातील प्रत्येकाला येथील रिंगण सोहळा पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण पिंपरीतील रिंगणाची आतुरनेते वाट पाहतात. मात्र, वाढीव तिथी आली, तरच पिंपरीत रिंगण घेता येते.
पालखी सोहळ्याचा कार्यक्रम मराठी महिन्याप्रमाणे आणि तिथीनुसार असतो. दर वर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमीला पालखी देहूतून प्रस्थान ठेवते. तसेच अमावास्येला बारामतीत पोहोचते. हा कार्यक्रम दर वर्षी ठरलेला आहे. मात्र, अमावास्येपूर्वी एखादी वाढीव तिथी आल्यास एक दिवस अधिकचा मिळतो. याच वाढीव तिथीनुसार २०१० व २०११ या वर्षी पिंपरीत मुक्काम घेण्यात आला. मुक्कामाच्या ठिकाणीच एचए मैदानावर रिंगण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. एचए मैदानावर अक्षरश: एक गावच वसले होते. लागोपाठ दोन वर्षे शहरवासीयांसाठी ती एक पर्वणीच ठरली होती. आबालवृद्धांनी हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठवून ठेवला.
आवडीने महिलांसह पुरुषांनी वारकऱ्यांच्या पोशाखात रिंगण सोहळ्याला हजेरी लावत हा सोहळा अनुभवला. या सोहळ्यालाही भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. असाच सोहळा पुन्हा व्हावा, अशी शहरवासीयांची इच्छा आहे.
पालखीचा मुक्काम आणि रिंगण सोहळा यामुळे पिंपरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक घरासमोर रांगोळी, भगवी पताका उभारली होती.
प्रत्येकाने आपआपल्या परीने वारकऱ्यांची सेवा केली. निवासासाठी घरातील खोली, पटांगण वारकऱ्यांना उपलब्ध करून दिले. जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच, वारकऱ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, परिसर अस्वच्छ होवू नये यासाठी अनेकांनी आपल्या घरातील स्वच्छतागृहदेखील वारकऱ्यांना वापरण्यासाठी दिले होते.