शहरवासीयांनी अनुभवला पावसाबरोबर काळोख
By admin | Published: November 24, 2015 12:59 AM2015-11-24T00:59:46+5:302015-11-24T00:59:46+5:30
शहरात दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारनंतर अंधार दाटून येऊन सर्वत्र काळोख पसरला होता.
पिंपरी : शहरात दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारनंतर अंधार दाटून येऊन सर्वत्र काळोख पसरला होता. पावसाची रिपरिप, काही वेळ ऊन आणि थंडी असा तिहेरी वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला.
धो धो पावसाने रविवारी रात्री शहवासीयांना झोडपून काढले होते. पाऊस इतका जोरदार होता की, समोरचे काही दिसत नव्हते. अनेक भागात पाणी साचून वाहतूककोंडी झाली. पाण्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी झाले. सखल भागातील घरांमध्ये पाणी साचले. काही भागात वीज गायब झाली. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळ आठपर्यंत पाऊस कायम होता. विश्रांती घेत दुपारी बारापर्यंत कडक ऊन पडले होते. सूर्यप्रकाशामुळे नागरिकांना हायसे वाटले. मात्र, दुपारनंतर वातावरण पुन्हा बदलले.
आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले. यात सूर्यही झाकोळला गेला. काहीशा अंधारातच दुपारी तीनच्या सुमारास पावसाची संततधार सुरू झाली. ती कायम होती. यामुळे अनेक भागात वाहतूक संथ होऊन कोंडी झाली. कालच्या पावसामुळे दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांनी रेनकोटचा वापर केला. अनेकांची डोक्यावर छत्री धरली होती. दिवाळीची सुटी संपून आज अनेक शाळा सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांना पावसात भिजत ये-जा करावी लागली. काही विद्यार्थ्यांनी रेनकोट घातले होते. पावसाची संततधार, ऊन आणि थंडी अशा तिहेरी वातावरणाचा अनुभव आज नागरिकांनी अनुभवला. दरम्यान, या संमिश्र वातावरणामुळे सर्दी, थंडी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. (प्रतिनिधी)
लोणावळ्यात
जोरदार सरी
लोणावळा : वातावरणात झालेल्या बदलामुळे रविवारी दुपारी व रात्री लोणावळा शहरात तब्बल ४५ मिमी पाऊस झाल्याने सर्वत्र रस्ते व सखल भागात पाणी तुंबले होते. शनिवारी सायंकाळपासून लोणावळा परिसरात ढगाळ वातावरण झाले होते. यामुळे उष्मा वाढला होता. रविवारी दुपारी सव्वाच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला होता. रात्री पुन्हा लोणावळा शहर व ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा व वाऱ्याचा वेग इतका होता की, वाहने चालवताना समोरचे दिसत नव्हते. यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.
दिवसा लागले दिवे...
सायंकाळी साडेचारच्या सुमारास अंधार अधिक दाटून आल्याने सर्वत्र काळोख पसरला. त्याविषयी नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे घर, कार्यालय आणि परिसरातील विजेचे दिवे लवकरच पेटविण्यात आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तर रात्रीच्या अंधारासारखे वातावरण निर्माण झाले होते.