शहरात साथीच्या आजारांचे थैमान, नागरिकांची दवाखान्यांत रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:08 AM2017-11-09T05:08:45+5:302017-11-09T05:08:49+5:30
शहरात डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत.
पिंपरी : शहरात डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खासगी रुग्णालये सध्या फुल्ल झाली आहेत. तर महापालिकेच्या रुग्णालयात गोरगरिबांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण असूनही जिल्हा प्रशासन अंधारात कसे? स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग झोपा काढत आहेत का? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
शहरात रोगाच्या साथींनी नागरिकांना पछाडले आहे. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, रहाटणी, काळेवाडी आदी भागातील खासगी दवाखान्यात चिकुनगुनिया, डेंगी, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या रोगाची शिकार
बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. साथीच्या आजाराने
जनता हैराण झाली असून, याबाबत प्रशासन मात्र सुस्त असल्याचे
दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून या साथींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी लाखो संख्येच्या शहरासाठी अत्यंत कमी कर्मचारी वर्ग आहे. सगळेच प्रशासकीय विभाग आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत. संबंधित गोरगरिबांच्या लोकांच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत.
बहुतांश प्रभागांत आजाराने थैमान घातले असून, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर परिसरातील बहुतांश घरातील सदस्य आजारी असल्याचे दिसून येत आहे. आजारी पडलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात नेऊन रक्त तपासल्यानंतर डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदीं आजाराचे निदान होत आहे. तसेच खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकनगुनियाच्या आजाराने रुग्ण दाखल झाले आहेत. रक्ताची तपासणी करण्याचे दर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.
महापालिकेच्या रुग्णालयात सध्या दररोज ४०० ते ५०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात विविध आजारांच्या तक्रारी घेऊन येत आहेत. साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून, परिसरातील प्रभागात स्वच्छता करणे तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न, नागरिकांत जनजागृती याकडे लक्ष देण्याची गरज आहे.