शहरास पडलाय डेंगीचा विळखा; प्रशासनाचे दुर्लक्ष, तीन हजार संशयित रुग्ण, ३४२ जणांना झाली लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 04:13 AM2017-11-05T04:13:06+5:302017-11-05T04:13:34+5:30
शहरात हिवतापाबरोबरच डेंगीच्या आजाराचा उद्रेक दिवसागणिक वाढत चालला आहे. जानेवारी ते आॅक्टोबरअखेर १० महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत तीन हजार तीन संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी ३४२ सदोष रुग्ण आढळले आहेत.
- स्वप्निल हजारे
पिंपरी : शहरात हिवतापाबरोबरच डेंगीच्या आजाराचा उद्रेक दिवसागणिक वाढत चालला आहे. जानेवारी ते आॅक्टोबरअखेर १० महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत तीन हजार तीन संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी ३४२ सदोष रुग्ण आढळले आहेत. एका बाजूला डेंगीचा आजार वाढत असताना डासांच्या निर्मूलनाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरात अनेक भागात कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच शहरात अनेक भागात महापालिकेतर्फे औषध फवारणी केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून डेंगीचा आजार रोखण्यासाठी योग्य प्रकारे उपाययोजना करण्यात न आल्याने डेंगीचा आजार वाढत आहे.
गेल्या दहा महिन्यांत डेंगीच्या रुग्णांबरोबरच हिवतापाचे ७७ हजार ३८६ संशयित रुग्ण आढळले. मलेरियाचे ३८ रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुनियाचे ५९ संशयित रुग्ण आढळले आहेत. साथीचे, डेंगी व स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक भागांत उघड्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी येत आहे. त्याठिकाणी साथीचे आजार वाढत आहे. मात्र, धूर फवारणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
प्रमुखांच्या वादात दुर्लक्ष
शहरात साथीच्या आजारांचे व डेंगीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाºयांमध्ये दोन महिन्यांपासून प्रमुख पद मिळविण्यावरून वाद सुरू आहेत. या सर्व वादात नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रतिबंधक उपाय
झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
डास घरात शिरू नयेत म्हणून खिडक्यांना जाळ्या बसवा.
हात, पाय झाकले जातील असे अंगभर कपडे वापरा.
डास पळवून लावणाºया कीटकनाशक औषधांची फवारणी
गेल्या दहा महिन्यांत डेंगीबरोबरच हिवतापाचे ७७ हजार ३८६ संशयित, मलेरियाचे ३८ रुग्ण, चिकुनगुनियाचे ५९ संशयित रुग्ण आढळले आहेत.
डासांमुळे होणारे आजार
मलेरिया
लक्षणे : ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे
डेंगी
लक्षणे : ताप, स्नायू दुखणे, सांधे दुखी, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे
चिकुनगुनिया
लक्षणे : आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ्यांचा दाह होणे.
अशी घ्यावी काळजी
- पाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, परिसरात साचलेले पाणी काढावे.
- न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळावे.
- जंतुनाशक धूरफवारणी करावी, तुंबलेल्या गटारी, जमा झालेले पाणी निर्जंतुक करावे, रोगांना पोषक ठरत असलेल्या वातावरणातील झालेल्या बदलानुसार योग्य ती काळजी घ्यावी, आहारात बदल करावा.