दावे निकालात काढण्याची सूचना
By admin | Published: June 27, 2017 07:33 AM2017-06-27T07:33:05+5:302017-06-27T07:33:05+5:30
जमिनींना सोन्याचा भाव आला असून हद्दीवरून वाद निर्माण होत आहे. परिणामी महसूल अधिकाऱ्यांकडे जमिनींच्या दाव्यांची संख्या वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : जमिनींना सोन्याचा भाव आला असून हद्दीवरून वाद निर्माण होत आहे. परिणामी महसूल अधिकाऱ्यांकडे जमिनींच्या दाव्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महसूलविषयक दाव्यांचा जलदगतीने निपटारा करण्याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी दरमहा ४० अपिले निकाली काढावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्र्रकांत दळवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महसूल विभागाकडे प्रलंबित दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने महसूल परिषदेमध्ये याबाबत चर्चा झाली होती. मात्र, महसूलविषयक दाव्यांची सुनावणी घेऊन त्यावर निकाल देण्यास वेळ लागतो. त्यातच अधिकाऱ्यांकडे दाव्यांबरोबरच इतर प्रशासकीय कामे असल्याने दावे निकाली काढण्यास विलंब होतो. शासकीय कार्यालयांमधून प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळून सर्व थकीत प्रकरणांचा निपटारा विशिष्ट कालमर्यादेत करण्याबाबत दळवी यांनी सूचना दिल्या आहेत. यामुळे वषार्नुवर्षे प्रलंबित असलेले दावे निकाली निघणार आहेत. अपिलांवर सुनावणी घेताना सर्वात जुन्या अपिलांवर प्रथम प्राधान्याने सुनावणी घ्यावी. त्याचबरोबर कमीत कमी तारखांमध्ये सुनावणी पूर्ण करावी.
मात्र, नैसर्गिक न्यायाचे तत्त्व पाळण्यात यावे. त्याचबरोबर अपिलांवर अंतिम सुनावणी झाल्यावर शक्यतो एक आठवड्याच्या आत निकालपत्र लिहून पक्षकारांना निर्णय कळविण्यात यावा, असेही दळवी यांनी स्पष्ट केले आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनांमुळे निर्णय प्रक्रियेस वेग येण्याची अपेक्षा
व्यक्त होत आहे.