मावळच्या आजी माजी आमदारामंध्ये उडाली शाब्दिक चकमक; तळेगाव एमआयडीसीवरून राजकारण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:46 PM2021-08-10T19:46:20+5:302021-08-10T20:13:12+5:30

तळेगाव एमआयडीसी रोडवर आंबी फाटा येथे शेतकरी कृती बचाव समितीच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन

Clash between Maval's Ncp Mla Sunil Shelke and former Mla Bala Bhegade | मावळच्या आजी माजी आमदारामंध्ये उडाली शाब्दिक चकमक; तळेगाव एमआयडीसीवरून राजकारण तापलं

मावळच्या आजी माजी आमदारामंध्ये उडाली शाब्दिक चकमक; तळेगाव एमआयडीसीवरून राजकारण तापलं

वडगाव मावळ : तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४ मधील रखडलेली ३२(१) ची प्रकिया पूर्ण करण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. १०) तळेगाव एमआयडीसी रोडवर आंबी फाटा येथे शेतकरी कृती बचाव समितीच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात आजी- माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरणात काहीकाळ तणाव होता.  तसेच महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा देखील लागल्या होत्या. अखेर भाषणबाजी बंद करून आंदोलन आटोपतं घेण्यात आले.

शेतकरी कृती बचाव समितीच्या वतीने मंगळवारी(दि. १०) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. याचवेळी या आंदोलनात मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. अखेर दोन तासाने हे आंदोलन संपले. दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. आमदार सुनील शेळके व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याने या कृती समितीत राजकारण होत असेल तर ही समिती बरखास्त करावी अशी मागणी देखील करण्यात आली.  

राज्य शासनाकडून १२ मे २०१७ रोजी एमआयडीसीबाबत आदेश जारी करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता .परंतू, प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी वगळण्यात येतील असे आश्वासन दिले होते. तसेच रोजगार, शैक्षणिक सोयी, स्थानिकांना विकासाची कामे देणे, पर्यावरणाचा त्रास होणार नाही व इतर मागण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. २७ डिसेंबर २०१८ रोजी शासनाने सदर एमआयडीसीसाठी एकरी ७३ लाख रूपये दर निश्चित केले होते. दर निश्चित केल्यामुळे गुंतवणूकदार एजंट तसेच शेतकऱ्यांच्या यांनी जाणीवपूर्वक सदर गावातील जमीन क्षेत्रात कायद्याच्या आधारे अडथळा निर्माण केला. त्यामुळे चारही गावातील शेतकरी हवालदिल झाले. भविष्यात काही विपरीत प्रकार घडू नये. म्हणून महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या कार्यालयात २७ डिसेंबर २०२० रोजी बैठक घेण्यात आली होती .एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभेदार यांनी १५ जानेवारीपर्यंत  ३२\१ ची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यानच्या काळात निगडे व कल्हाट ही दोन गावे इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असल्याचे समोर आले. त्यामुळे २२ एप्रिल २०२१ रोजी आंबळे गावापुरता ३२\१ चा आदेश झाला.तो आदेश होऊनही चार महिने उलटूनही पुढील प्रक्रिया झालेली नाही.

राजकारण करून काहीजण मला बदनाम करताहेत : आमदार सुनील शेळके यांचा आरोप 
तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक ४ हा पूर्ण झाला पाहिजे  त्याच बरोबर शेतकऱ्यांना न्याय देखील मिळाला पाहिजे. मी सत्ताधारी आमदार जरी असलो तरी स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्यामागे ठामपणे उभा राहणार आहे. काहीजण यात राजकारण करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते कदापिही होणार नाही.

दीड वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी अपयशी - माजी राज्यमंत्री बाळा भेगडे 
तळेगाव एमआयडीसी करीता ६ हजार जमीन घेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी होती.३२\१ लागू केला असता तर शेतकऱ्यांची फसवणूक थांबली असती.शेतकऱ्यांच्या हितासाठी मी शेतक-यांबरोबर राहील. मी कोणतेही राजकारण करत नाही. प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच अन्यथा आगामी काळात संपूर्ण एमआयडीसी बंद केली जाईल असा इशारा शांताराम कदम याच्यासह कृती समितीतील शेतकऱ्यांनी दिला आहे.

या आंदोलनप्रसंगी आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, सुनील भोंगाडे, दतात्रय पडवळ,यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. चे शांताराम कदम, नथू थरकुडे, संतोष जाचक, मधुकर धामणकर,,मोहन घोलप, भिकाजी भागवत, रामदास चव्हाण, बबनराव अगिवले, संदेश शेलार, बंडू कदम, सागर यादव यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. 

Web Title: Clash between Maval's Ncp Mla Sunil Shelke and former Mla Bala Bhegade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.