चऱ्होलीत दोन गटांत हाणामारी; २० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 07:51 PM2023-07-12T19:51:09+5:302023-07-12T19:53:02+5:30
चऱ्होली येथे रात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली...
पिंपरी : किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल केले. चऱ्होली येथे मंगळवारी (दि. ११) रात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली.
मंगेश हवप्पा मठपती (वय ३५, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनोद विठ्ठल पाथरूट (वय २६, रा. लोहगाव), जीवन विठ्ठल पाथरूट (वय २७), महिंद्र बाबूराव पवार (वय ३०), आदित्य राजेश गुप्ता (वय २१), साहिल मोहन मिसाळ (वय २३), अवनिश दिनेश उपाध्याय (वय २१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह इतर १२ ते १४ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र हे जेवण करून परत येत असताना त्यांना पाच ते सहा जण घोळका करून उभे असल्याचे दिसले. यावेळी फिर्यादींना शंका आल्याने त्यांनी आरोपींना हटकले. याचा राग येऊन आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला हे कोण आहेत, अशी फिर्यादींनी विचारले असता, त्यानेही धक्काबुक्की केली. थोड्या वेळात दुचाकीवरून १५ ते २० जण सिक्युरिटी गार्डच्या गणवेशात आले व त्यांनी फिर्यादीला मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. याच्या परस्परविरोधात विनोद विठ्ठल पाथरूट यांनी फिर्याद दिली. स्वप्नील देवकर व मंगेश मठपती व त्यांचा आणखी एक साथीदार यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेटवर भांडण झाल्याचे समजताच फिर्यादी व त्यांचे साथीदार भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत तसेच मारहाण करून फिर्यादी व त्यांच्या भावाला जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.