मोबाइल न दिल्याने दहावीतल्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल, सातव्या मजल्यावरून मारली उडी
By नारायण बडगुजर | Published: October 12, 2023 11:30 PM2023-10-12T23:30:42+5:302023-10-12T23:31:54+5:30
देहू येथे बुधवारी रात्री घडली विचित्र घटना
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: मोबाइल दिला नाही म्हणून दहावीतील १५ वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. देहू येथे बुधवारी (दि. ११) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.
आर्या गणेश सावंत (रा. अभिलाषा हाऊसिंग सोसायटी, देहू) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे सांगोला येथील असलेले आर्या हिचे वडील गणेश सावंत आणि आई देखील साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत. सावंत दाम्पत्याला दोन मुली होत्या. त्यात आर्या मोठी मुलगी होती. बुधवारी आर्या हिने मोबाइल मागितला. मात्र, आईवडिलांनी मोबाइल देण्यास नकार दिला. त्यामुळे आर्या हिने त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.