अभिलेखांचे वर्गीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:34 AM2017-08-05T03:34:01+5:302017-08-05T03:34:01+5:30
मावळ पंचायत समितीच्या अभिलेखांचे वर्गीकरण, परिरक्षण व नाशन मोहिमेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
वडगाव मावळ : मावळ पंचायत समितीच्या अभिलेखांचे वर्गीकरण, परिरक्षण व नाशन मोहिमेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मावळ पंचायत समितीच्या आस्थापना, वित्त, कृषी, पशुसंवर्धन, वन, समाजकल्याण, शिक्षण, वैद्यकीय, आयुर्वेद, सार्वजनिक आरोग्य, इमारती व दळणवळण, सार्वजनिक आरोग्यविषयक अभियांत्रिकी कामे, पाटबंधारे, उद्योगधंदे व कुटिरोद्योग, सहकार, सामुदायिक विकास, समाज शिक्षण, ग्रामीण घरबांधणी, ग्रामपंचायती आदी अभिलेखांचे वर्गीकरण, परिरक्षण व नाशन मोहीम सुरूआहे.
अ वर्ग अभिलेख कायमचे जतन करून ठेवायचे, त्याचे तांबड्या रंगाचे दस्त आणि ब वर्गाचे अभिलेख ३० वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन ठेवायचे, त्याचे हिरव्या रंगाचे दस्त करायचे; क वर्गाचे अभिलेख १० वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन ठेवायचे, त्याचे पिवळ्या रंगाचे दस्त आणि क (१) वर्गाचे अभिलेख ५ वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन ठेवायचे त्याचे पांढºया रंगाचे दस्त करायचे. एक वर्षाच्या कालावधीपर्यंत जतन केलेले ड वर्ग अभिलेख नाशन करण्याचे कामकाज सुरू आहे. गटविकास अधिकारी नीलेश काळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू आहे. या कामाचे कौतुक पुणे जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी केले. पाहणी करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले, सभापती गुलाबराव म्हाळसकर, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, उपसभापती शांताराम कदम आदींनी कौतुक केले. गटविकास अधिकारी काळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, सरपंच संभाजी म्हाळसकर, अप्पासाहेब गुजर, कक्षाधिकारी विठ्ठल भोईर, शशीकिरण कालेकर व कर्मचारी उपस्थित होते.