स्वच्छ सर्वेक्षण अभियान : लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:43 AM2018-06-24T02:43:36+5:302018-06-24T02:43:41+5:30
भारत देशातील सर्व राज्ये व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे
लोणावळा : भारत देशातील सर्व राज्ये व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे. नुकताच या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला. देशात पहिल्या १० शहरांमध्ये लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एकमेव शहर आहे.
सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरुवात झाली. हे अभियान सुरू होण्याच्या किमान वर्षभर अगोदरपासूनच लोणावळा शहरात स्वच्छ मोहिमांना सुरुवात झाली होती. यातच हे सर्वेक्षण सुरू झाल्याने लोणावळा नगर परिषदेच्या सोबत येथील लोणावळा शहर पत्रकार संघ, लोणावळा शहर चित्रकार ग्रुप, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व नागरिक यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत लोणावळा शहरातील प्रत्येक भाग हा स्वच्छ करण्याकरिता प्रयत्न केले. या अभियानाला नागरिकांची साथ मिळाल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ही लोणावळेकरांची मोहीम बनली होती. यातच शहरातील चित्रकार मंडळींनी विनामोबदला शहरातील सर्व भिंतींवर आकर्षक चित्र रेखाटत शहराचे रूपडे बदलले, तर पत्रकार संघाने नगर परिषदेच्या सोबत स्वच्छ सर्वेक्षण या विषयावर चित्रकला स्पर्धा घेतली. या उपक्रमाला राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी भेट देत मुलांशी संवाद साधला होता. या दोन्ही उपक्रमांना देशात अनुक्रमे पाचवा व दुसरा क्रमांक मिळाला होता.
केवळ शहरातील रस्ते किंवा कचराकुंड्या साफ न करता प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, आरोग्य विभागाच्या माजी सभापती पूजा गायकवाड, विद्यमान सभापती बिंद्रा गणात्रा आदींनी केले. नगर परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या सर्वेक्षणाकरिता झोकून देऊन काम केले. नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली आहे. सामूहिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे सांगत या मोहिमेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या सर्वांनी त्यांनी या यशाचे मानकरी ठरविले आहे.