रस्त्याकडेच्या बेवारस वाहनांमुळे शहरातील स्वच्छता मोहीम निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 02:26 AM2019-02-04T02:26:09+5:302019-02-04T02:27:49+5:30

केंद्र सरकारतर्फे देशभर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ राबविण्यात आले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी तयारी केली होती. जनजागृतीसह विविध उपक्रम त्यासाठी राबविण्यात आले.

Cleanliness campaign in the city is fruitless due to unemployed vehicles on the road | रस्त्याकडेच्या बेवारस वाहनांमुळे शहरातील स्वच्छता मोहीम निष्फळ

रस्त्याकडेच्या बेवारस वाहनांमुळे शहरातील स्वच्छता मोहीम निष्फळ

Next

- शिवप्रसाद डांगे

रहाटणी  - केंद्र सरकारतर्फे देशभर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ राबविण्यात आले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी तयारी केली होती. जनजागृतीसह विविध उपक्रम त्यासाठी राबविण्यात आले. असे असले तरी बेवारस आणि रस्त्याकडेच्या वाहनांमुळे स्वच्छता अभियानात अडथळा निर्माण झाला. रस्त्याकडेला अनेक दिवसांपासून असलेल्या वाहनांखाली कचरा साचून आहे. त्यामुळे हे स्वच्छता अभियान पूर्णपणे निष्मळ ठरले असल्याचे पिंपरी-चिंचवड शहरात दिसून येत आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. अद्यापही अनेक रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र या रुंद आणि प्रशस्त रस्त्यांवर अनधिकृत पार्किंगचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा, मोकळ्या जागांवर, खासगी मालकीच्या जागांवर आणि अडगळीच्या ठिकाणीही बेवारस वाहने पार्किंग केल्याचे किंवा पडून असल्याचे दिसून येत आहे. अशी वाहने अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी असल्याने संबंधित जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. तसेच वाहनांवर धूळ साचलेली असते. अशा वाहनांच्या खालील कचरा संकलित करणे सफाई कामगारांना सहज शक्य होत नाही. तसेच वाहनांवरील धूळ साफ करणेही शक्य होत नाही. त्यामुळे शहरातील स्वच्छता अभियानात अडथळा निर्माण झाला. बेवारस आणि अनधिकृत पार्किंग केलेलया वाहनांमुळे शहराच्या सौंदर्यासही बाधा पोहोचत आहे. रस्त्याकडेच्या बेवारस आणि अनधिकृत पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष
शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र त्याबाबत सर्वच यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत रीतसर तक्रार करून संबंधित यंत्रणेला त्याबाबत सूचना करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. तसेच पोलिसांकडूनही या बेवारस आणि अनधिकृत पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

अनधिकृत पार्किंगमध्ये झाली वाढ
पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवड, पिंपरी आदी भागांत रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांच्या रांगा दिसून येतात. त्यामुळे सफाई कामगारांना कोणत्याही रस्त्याची पूर्ण सफाई करता येत नाही. परिणामी या वाहनांमुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला. त्यासाठी महापालिकेतर्फे मोठा खर्च करून विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण’ संपले तरीही मोठी यंत्रणा राबवून स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र बेवारस वाहने आणि रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेली वाहने यामुळे महापालिकेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. स्वच्छतेचे स्वप्न पाहणाऱ्या या शहराला त्यामुळे बकालपणाचे स्वरूप येत आहे.

चांगल्या प्रकारे स्वच्छता करण्याकडे महापालिकेने भर दिलेला आहे. त्यानुसार परिसर स्वच्छ झाला आहे. मात्र रस्त्याकडेच्या वाहनांमुळे काही ठिकाणी अडचण होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाºयांना याबाबत माहिती दिली आहे. वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची व वाहतूक पोलिसांची आहे. वाहनांखालील कचरा साफ करताना सफाई कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- व्ही. के. बेंडाळे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

सांगवी वाहतूक विभाग परिसरातील रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची यादी महापालिका प्रशासनाच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाकडे दिली आहे. महापालिका हद्दीतील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व महापालिका पोलिसांची आहे. सांगवी परिसरातील सुमारे १४ बेवारस वाहनांवर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. ही वाहने संबंधित मालकांनी न हलविल्यास बेवारस म्हणून या वाहनांवर कारवाई करून ती जप्त केली जाणार आहेत.
-नितीन जाधव, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, सांगवी

वाहनांखालील कचरा काढता येत नाही. त्यामुळे वाहनांखाली कचरा साचत आहे. हाच कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे पुन्हा परिसरात अस्वच्छता दिसून येत आहे. इच्छा असूनही पूर्णपणे साफसफाई करता येत नाही. वाहनांखालील कचºयाची साफसफाई करताना वाहनांचा पत्रा लागण्याचे प्रकार घडले आहेत. वाहने हटविल्यास साफसफाई करता येईल.
- इस्माईल शेख,
सफाई कामगार

दररोज सकाळी सात वाजता साफसफाईला आम्ही सुरुवात करतो. साफसफाई करताना अनेक वेळा वाहनांखालून साप निघतात. त्यामुळे आमच्या जिवालाही धोका आहे. याबाबत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे.
- सिद्धार्थ सातपुते,
सफाई कामगार

Web Title: Cleanliness campaign in the city is fruitless due to unemployed vehicles on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.