शिवकालीन कोरीगडावर स्वच्छता आणि श्रमदान मोहीम; नितेश राणे यांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:05 PM2018-01-29T16:05:23+5:302018-01-29T16:11:02+5:30
आंबवणे गावाजवळील कोरीगडावर गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवप्रेमींनी कोरीगडावरील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले.
लोणावळा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आणि ठेव्याची जपणूक करण्यासाठी राजमाता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त रविवार (दि. २८) रोजी आंबवणे गावाजवळील कोरीगडावर गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत शेकडो शिवप्रेमींनी कोरीगडावरील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले. भल्या सकाळीच कोरीगडाच्या पायथ्याला दाखल झालेल्या आमदार नितेश राणे यांनी गडावर पोहचत कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावत मोहिमेत श्रमदान केले.
यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना आमदार नितेश राणे म्हणाले, की शिवरायांचे हे गडकिल्ले आणि त्यांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. आपली छाती अभिमानाने फुलून येते. शिवरायांच्या या अमूल्य विचारांचे आणि त्यांच्या ठेव्याचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे. गडकिल्ल्यांची आपण जेवढी काळजी घेत आहोत तशीच काळजी शिवरायांच्या इतिहासाचीही घेतली पाहिजे.
यावेळी स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे लोणावळा अध्यक्ष शौकत शेख, राजमाता प्रतिष्ठानचे संतोष गायकवाड, सरपंच मच्छिंद्र कराळे, पिंपरी चिंचवड स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष हेमंत चव्हाण, खालापुर अध्यक्ष आकाश सटाणे, अभिषेक ओव्हाळ, इम्रान शेख, संकेत कुटे, इरफान शेख, साजिद शेख, साहिब अन्सारी, आशिष गुप्ता, संकेत जाधव, केदार मुगल, सागर बेल्लुर, अल्पेश दास, सचिन शिंदे, मंगेश कदम, समिर शेख, सादिक शेख, अक्षय मोरे, अमिर खान, बापुसाहेब शेळके, विशाल मांगडे, मंगेश पवार, संतोष रणपिसे, सुधाकर मिरगणे यासह शिवप्रेमी उपस्थित होते.