स्वच्छता पंधरवड्यानंतरही अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:04 AM2018-10-05T00:04:06+5:302018-10-05T00:04:35+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : स्वच्छता कधी होणार? नागरिकांचा सवाल
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश देत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीच्या विविध भागातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. कॅन्टोन्मेंट रुग्णालय व शाळांच्या परिसरातील स्वच्छताही पंधरवड्यात होऊ शकलेली नाही. शौचालये, स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याकडे, तसेच अनेक महिन्यांपासून वर्दळीच्या रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी रोखण्याकडे व वर्दळीच्या मुख्य रस्त्यालगत असणारे गवत, झाडेझुडपे काढण्याकडेही दुर्लक्ष झाल्याने या परिसराची स्वच्छता कधी होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालय प्रांगणात आमदार संजय भेगडे यांच्या उपस्थितीत स्वच्छता पंधरवड्याला १५ सप्टेंबरला सुरुवात करण्यात आली होती. मंगळवारी गांधी जयंतीच्या दिवशी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ पी वैष्णव यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी प्राथमिक शाळेत स्वच्छता पंधरवड्याची सांगता झाली. संरक्षण विभागाकडील निर्देशानुसार १५ दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र, निश्चित केलेला सर्व कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. अभियानात नागरिकांचा सहभाग घेणे अपेक्षित असताना त्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात आल्याचे निदर्शनास आले नाही. स्वच्छता पंधरवड्याचा सांगता कार्यक्रमही नागरिकांशिवाय पार पडला.
स्वच्छता पंधरवड्याचा केवळ सोपस्कार पार पाडताना पहिल्या दिवशी झालेल्या रॅलीचे ‘फोटोसेशन’ झाले. त्यानंतर विविध वार्डांतील शाळांच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता जनजागृतीसाठी रॅली काढून पथनाट्य सादर केले. अभियानात कचरा साफसफाई व कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाले असून, अद्यापही विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. शौचालयांकडे जाणाºया रस्त्यांची सफाई झालेली नाही. रस्त्यालगत झाडेझुडपे तशीच आहेत. शौचालयांच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असून, अनेक ठिकाणी राडारोडा पडलेला आहे. विकासनगर रस्त्याच्या बाजूला लोखंडी जाळीलगत सार्वजनिक मोकळ्या जागी टाकण्यात येत असलेला कचरा उचललेला नाही. चिंचोली येथे मुख्य बसथांब्याजवळ चिंचोलीचा फलक व कॅन्टोन्मेंट बोर्डाचा जनजागृतीचा अर्ध्याहून अधिक फलक झाडात झाकला गेला असून तेथे साफसफाई करण्यात आलेली नाही. विकासनगरकडे जाणाºया रस्त्यावर असलेली कुंडी गेले काही दिवस उचलली नसल्याने दुर्गंधीने येथून नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
सांडपाणी वाहतेय रस्त्यावर
देहूरोड दूरध्वनी केंद्राकडून संकल्पनगरी भागात जाणाºया रस्त्यावर सांडपाणी वाहत असून, अभियानाच्या १५ दिवसांतसुद्धा सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांना त्यातूनच मार्ग काढत नियमित ये-जा करावी लागत आहे. देहूरोडकडून शितळानगरकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी सांडपाणी वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता अभियानात १७ दिवसांत सफाई झाली नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत असून, येथे स्वच्छता होणार का, असा सवाल उपस्थित करीत आहेत. पुरेशी शौचालये उपलब्ध करून देण्याची गरज
कॅन्टोन्मेंट बोर्डाने देहूरोड हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा गेल्या वर्षी केली आहे. वास्तविक लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी शौचालयांची गरज असून, त्या प्रमाणात शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित कार्यकाळ ठरविण्याची गरज व्यक्त होत आहे. स्वच्छता पंधरवडा सांगता कार्यक्रमात (मंगळवारी) मनोगत व्यक्त करताना कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे यांनीही जाहीरपणे वॉर्ड क्रमांक २,३ व ४ मध्ये पुरेशी शौचालये उपलब्ध करून देण्याची मागणी केली.