बंद सिग्नल, आयलँडमुळे रावेतमध्ये वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:58 AM2018-10-28T01:58:03+5:302018-10-28T01:58:46+5:30
पुरेसे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून कार्यान्वित होणार स्वतंत्र वाहतूक विभाग
रावेत : वाहनांची दररोज वाढणारी संख्या, पार्किंगचा प्रश्न, सततची वाहतूककोंडी या समस्यांमुळे रावेत येथील नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून येथील मुख्य चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेचे झाले आहेत. तसेच येथील मुख्य चौकांतील काही आयलँडमुळे या भागात वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाययोजनांची मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार वाहतूक नियमनासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभागही कार्यान्वित करण्यात येणार आहे.
रावेत उपनगरातील संत तुकाराममहाराज पुलाशेजारील बीआरटी चौक, रावेत प्राधिकरण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन लगतचा धर्मराज चौक येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेली वाहतूक नियंत्रक दिव्यांची यंत्रणा बंद आहे. त्यामुळे येथील वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून वाहतुकीच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषत: चौकात रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतुकीची समस्या सोडवा, अशी मागणी नागरिकांची आहे.
रावेत उपनगराचा विस्तार वाढत आहे. वाढीव हद्दीत योग्य नियोजन होऊ शकते हद्दीतील बाजारपेठांमध्ये व्यापार संकुल उभारताना वाहनतळासाठी जागा ठेवणे सक्तीचे करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. विविध चौकांत वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. हे दिवे केवळ शोभेचे असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. हे दिवे सुरू नसल्याने वाहनांवर, वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण होत नसल्याचे चित्र आहे. परिसरातील सर्वच रस्त्यांवर दुतर्फा वाहने लावली जातात. सायकलवर जाणारे विद्यार्थी तसेच वाहनचालकांची बीआरटी चौकात मोठी गर्दी होते. त्यातच वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने नियंत्रण नसलेले वाहनचालक पुढे जाण्याच्या शर्यतीमधून वाहने चालवितात. या वेळी विद्यार्थी, पादचारी यांना अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या चौकासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि धर्मराज चौकातदेखील हेच चित्र आहे. विशेषत: आठवडेबाजाराच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.
आकुर्डी रेल्वे स्थानकापासून धर्मराज चौकाजवळ असल्याने या चौकात कायम गर्दी असते. चौकामध्ये लोकल रेल्वे आल्यानंतर तसेच या मार्गावरील महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्या वेळी भरचौकात एकच गर्दी होते. या वेळी वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते.
पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणी
अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण दिवे उभारले असले तरी नागरिकांकडूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. काही दिवसांपासून या चौकात अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. येथील वाहतूक नियंत्रण दिव्यांचा वापर योग्य होण्यासाठी पोलीस आयुक्तांनीच लक्ष द्यालावे, अशी मागणी होत आहे.
वाहनांची या मार्गावर दिवसभर मोठी वर्दळ सुरू असते. परंतु रस्ता ओलांडायच्या घाईमुळे दररोज लहान-मोठ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. येथील मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रण दिवे सतत बंद असतात. वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचाºयांची नेमणूकही करण्यात आलेली नाही. नवीन पोलीस आयुक्तालय झाल्याने या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करावा़ - श्रीकांत धनगर, अध्यक्ष,
जय मल्हार प्रतिष्ठान, रावेत
नवीन पोलीस आयुक्तालय झाल्यापासून धर्मराज चौक चिंचवड विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या चौकातील तीन आयलँडमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. आयलँडमुळे येथील नियंत्रण दिवे बंद ठेवण्यात आले आहेत. याबाबत महापालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे. या चौकातील आयलँड महापालिका लवकरच हलविणार आहे. येथे जुन्या बोगद्यामधून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
- संजीव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, चिंचवड
रावेत येथील विविध मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा कधीही सुरुळीतपणे चालू नसते़ त्यामुळे नागरिक विशेषत: तरुण वर्ग वाहतुकीचे नियम तोडतात. फक्त यंत्रणा बसवून उपयोग नाही तर नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. या चौकात वाहतूक विभागाचे कर्मचारी दररोज नियमित नियुक्त करावेत.
- अक्षय रामदास भोंडवे, स्थानिक युवक
देहूरोड आणि तळेगाव विभागासाठी स्वतंत्र वाहतूक विभागाची स्थापना करण्यात आली असून, पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या विभागासाठी आवश्यक असणाºया कर्मचाºयांची नियुक्तीही लवकरच करण्यात येईल. या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यान्वित होणार आहे. त्यांनतर या भागातील वाहतुकीचा प्रश्न सुटेल. बंद अवस्थेतील वाहतूक नियंत्रण दिवे तत्काळ सुरू करण्यात येतील. - विनायक ढाकणे,
सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग
सकाळी व सायंकाळी या चौकात रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांना कसरत करावी लागते. वाहनचालकांच्या वेगामुळे पायी चालणाºयांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. नियमांचे पालन न करणाºया वाहनचालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. - विनोद राठोड, स्थानिक नागरिक