लाॅण्ड्रीवाल्याकडे कपडे दिले अन् पोलिसांनी ‘त्यांना’ धुतले! नेमकं काय घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 04:16 PM2023-06-20T16:16:14+5:302023-06-20T16:16:28+5:30
केंद्र सरकारचे बडे अधिकारी असल्याचे सांगून मुली आणि महिलां फसवत होते
पिंपरी : केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर अधिकारी असल्याचे सांगून मॅट्रिमोनियल साइटवरून विविध राज्यांतील तब्बल २५० मुलींना दोघांनी फसवले. आरोपींचे नाव, आधारकार्ड बनावट असल्याने तपासाचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. तरीही पोलिसांकडून सातत्याने तपास सुरूच होता. दरम्यान, आरोपींनी एका जुन्या मोबाइलमध्ये सिमकार्ड टाकले अन् पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडला. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचा माग काढून बेंगळुरू गाठले. तेथे आठवडाभर तळ ठोकून पोलिसांनी एका लाॅण्ड्रीवाल्याला आरोपींकडे पाठवले अन् आरोपी अलगद जाळ्यात अडकले. आरोपींनी लाॅण्ड्रीवाल्याकडून कपडे धुऊन घेतले आणि पोलिसांनी आरोपींना धुतले.
एक सामाजिक कार्यकर्ता तरुणी जानेवारी २०२२ मध्ये वाकड पोलिसांकडे आली. एकाच व्यक्तीने तिघींनाही फसविल्याची तक्रार केली. वाकड पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे तपास देण्यात आला. पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या राज्यात जाऊन आरोपींविरुद्ध पुरावे गोळा केले आणि त्यांना बेड्या ठोकल्या. दोघेही आरोपी जीवनसाथी मॅट्रोमॉनियल साइटवर बनावट नावाने खाते, प्रोफाइल तयार करून स्वतःला केंद्र सरकारचे बडे अधिकारी असल्याचे सांगायचे. मुलींना भेटायला जाताना आलिशान गाड्यांमधून जायचे. त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचे. आरोपी एका शहरात दोन-तीन महिने थांबायचे. त्यासाठी बनावट नाव, आधारकार्ड वापरायचे. त्यांनी अशा पद्धतीने गुडगाव, जयपूर, पुणे आणि बेंगळुरू अशा महानगरांमध्ये मुली, महिलांची फसवणूक केली.
मोबाइल ॲक्टिव्ह झाला अन्....
आरोपी नवीन मोबाइल घेऊन नवीन सिमकार्ड वापरायचे. यातील काही मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांकडून सुरू होते. दरम्यान, आरोपींनी एका जुन्या मोबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकले. त्यामुळे मोबाइल ॲक्टिव्ह झाला. त्यासोबतच एका केबल ऑपरेटर कंपनीकडून देखील पोलिसांनी माहिती घेतली. त्यावरून आरोपींचा माग काढत वाकड पोलिसांचे पथक बेंगळुरूत दाखल झाले. आरोपी राहत असलेल्या सोसायटीत एक लाॅण्ड्रीवाला दररोज कपडे घ्यायला जायचा. पोलिसांनी लाॅण्ड्रीवाल्याला विश्वासात घेतले. आरोपी कोणत्या फ्लॅटमध्ये आहेत, किती वाजता ते दोघेही एकत्र फ्लॅटमध्ये राहतात, याबाबत पोलिसांनी लाॅण्ड्रीवाल्याकडून माहिती घेतली आणि सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.
''आरोपींनी विविध क्षेत्रातील महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली. काही जणींवर लैंगिक अत्याचार केले. त्यातील काही पीडिता पुढे आल्याने विविध राज्यांमध्ये नऊ गुन्हे झाले. - डाॅ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक''