सह पोलीस आयुक्त डॉ, रवींद्र शिसवे आणि तीन अन्य अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 11:13 PM2021-01-25T23:13:50+5:302021-01-25T23:14:34+5:30
President's Police Medal News : डॉ. रवींद्र शिसवे हे २००८ च्या बॅचचे आयपीएस आहेत. डॉ. शिसवे यांना यापुर्वी अंतरिक सुरक्षा सेवा पदक आणि हार्डशीप स्पेशल सर्व्हिस पदक मिळाले आहे.
पुणे - पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना राष्ट्रपतीचे शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांना गुणवत्तपूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे. सध्या नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले व हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
डॉ. रवींद्र शिसवे हे २००८ च्या बॅचचे आयपीएस आहेत. डॉ. शिसवे यांना यापुर्वी अंतरिक सुरक्षा सेवा पदक आणि हार्डशीप स्पेशल सर्व्हिस पदक मिळाले आहे. त्यांना आतापर्यंतच्या सेवा काळात ५५ बक्षिसे मिळाली आहेत. सेवा काळात अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत कौशल्य मिळविण्यासाठी डॉ. शिसवे यांनी आतापर्यंत ३ वेळा परदेशात प्रशिक्षण घेतले आहे. त्यांची मे २०१९ मध्ये सह पोलीस आयुक्त म्हणून पदोनन्ती झाली आहे.
गजानन पवार
गजानन पवार यांनी आतापर्यंत मुंबई, नागपूर, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि पुणे शहरातील गुन्हे शाखेत उत्कृष्टपणे कर्तव्य बजावले आहे. ते १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत भरती झाले. पोलीस दलात कार्यरत असताना त्यांना आतापर्यंत एकूण ४७५ बक्षीसे मिळाली आहेत. त्यांना २०११ मध्ये पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह आणि २०१९ मध्ये राष्ट्रपतीचे पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यंदा त्यांना राष्ट्रपतीचे शौर्य पदक जाहीर झाले आहे.
मेघश्याम डांगे
मेघश्याम डांगे हे १९९२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. त्यांनी नागपूर, नाशिक ग्रामीण, ठाणे शहर, धुळे, नंदूरबार याठिकाणी सेवा बजावली आहे. ठाणे येथे नेमणुकीस असताना बनावट क्रेडिट कार्ड तयार करून लोकांची फसवणूक करणार्या टोळीला त्यांनी अटक केली होती. त्यावेळी आरोपींकडून १ हजार बनावट कार्ड जप्त करण्यात आले होते.
शाकीर जिनेडी
शाकीर जिनेडी हे १९८७ मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यांची पोलीस दलात ३३ वर्षे सेवा झाली असून त्यांना आतापर्यंत ४६० बक्षीसे मिळाली आहेत. ते उत्कृष्ट ॲथलॅटिक्स खेळाडु असून त्यांना १९८९ मध्ये राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडुचा मान मिळाला होता. २०१७ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. पोलीस सेवेतील कालावधीमध्ये त्यांनी १०० हून अधिक पिस्तुले जप्त केली आहेत.
पोलिस दलात काम करण्यास मिळणे ही खरोखर पुण्याईची गोष्ट आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मला माझे सर्व गुरुस्थानी असलेले वरिष्ठ यांची आवर्जुन आठवण येते. हा पुरस्कार मी माझ्या गुरुस्थानी असलेल्या सर्व वरिष्ठांना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो.
- डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलिस आयुक्त पुणे शहर