आचारसंहिता लागू; प्रशासनाची धावपळ

By admin | Published: January 12, 2017 03:00 AM2017-01-12T03:00:40+5:302017-01-12T03:00:40+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारीला होणार असून, आचारसंहिता जारी झाल्याने निवडणूक

Code of Conduct Applicable; Runway of administration | आचारसंहिता लागू; प्रशासनाची धावपळ

आचारसंहिता लागू; प्रशासनाची धावपळ

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारीला होणार असून, आचारसंहिता जारी झाल्याने निवडणूक विभागाच्या वतीने अंमलबजावणीचे नियोजन केले आहे. राजकीय पक्षांचे फलक काढणे, पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच निवडणूक कालखंडात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी ‘फ्लाइंग स्कॉड’ही सज्ज झाले आहे.
गेल्या आठवडाभरापासून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा होती. मतदान कधी असणार, मतमोजणी कधी असणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा होती. मंगळवारी दुपारी चारला राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यातील नियोजनानुसार आता महापालिकेच्या निवडणूक विभागाने नियोजन सुरू केले आहे.
महापालिकेच्या मुख्यालयातील तळ मजल्यावरील विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रम जाहीर केला असला तरी सायंकाळी सहापर्यंत महापालिकेस कोणताही आदेश प्राप्त झालेला नव्हता. तरीही निवडणूक विभागाने नियोजन सुरू केल्याचे दिसून आले.पुरवणी मतदारयादी अद्ययावतीकरणाचे कामकाज पूर्ण झाले आहे. भागयाद्या गुरुवारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

पदाधिकाऱ्यांची वाहने घेतली काढून

 आचारसंहिता लागू होताच महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महिला व बालकल्याण, विधी समिती, क्रीडा समिती, शिक्षण मंडळ सभापती, उपसभापती अशा एकूण २२ पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याच्या सूचना निवडणूक विभागाकडून आल्यानंतर पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे महापालिकेच्या आवारात पदाधिकाऱ्यांची वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती.
नगरसेवकांच्या फोन बिलांवरही नियंत्रण
 महापालिका पदाधिकाऱ्यांची दूरध्वनी बिले महापालिकेकडून दिली जातात. मात्र, आचारसंहिता जारी झाल्यापासून आचारसंहिता संपेपर्यंत पदाधिकाऱ्यांची फोन बिले महापालिका भरणार नाही. चाळीस दिवसांची बिले संबंधित पदाधिकाऱ्यांना स्वत:च भरावी लागणार आहेत, असेही निवडणूक विभागाच्या वतीने कळविले आहे.
आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी
 निवडणूक विभागाच्या तयारीची माहिती सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली. माने म्हणाले, ‘‘आचारसंहितेसंदर्भात आदेश प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने महापालिका क्षेत्रासाठी आदेश काढण्यात येईल. वाहन विभागाला पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात येतील. तसेच आदर्श आचारसंहितेची कार्यवाही करण्याचे नियोजन केले आहे.’’
११ निवडणूक अधिकारी
 आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाने नियोजन सुरू केले आहे. निवडणुकीसाठी सुमारे १७०० मतदार केंद्र असणार असून, एकूण मतदार १२ लाख ०३५५२ असून त्यासाठी ११ निवडणूक निर्णय अधिकारी असणार असून, ३३ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. तसेच सुमारे शिपाई संवर्ग वगळता साडेआठ हजार आणि इतर दोन हजार असे एकूण दहा हजार कर्मचारी असणार आहेत. कर्मचारी कमी पडणार नाहीत, असे नियोजन केले आहे, असे डॉ. माने यांनी सांगितले.
फ्लेक्सवर कारवाई कधी?
 निवडणूक असल्याने महापालिकेतील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी सुरू असल्याचे दिसून आले होते. मात्र, महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होते. आचारसंहिता जारी होताच प्रभागातील फ्लेक्स काढून घेण्याचे काम इच्छुकांनी सुरू केले असल्याचे दिसून आले. अतिक्रमणविरोधी पथकांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
भरारी पथकाची असणार नजर
 निवडणूक आचारसंहिता कालखंडात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेतले जातात. मतदारांना आमिषे दिली जातात. अशा कार्यक्रमांवर निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे. त्यासाठी ११ पथके नियुक्त केली जाणार आहेत. त्यापैकी एक पथक आजपासून कार्यान्वित केले आहे. निवडणूक विभागाकडे तक्रार आल्यानंतर त्याबाबतची प्राथमिक माहिती पोलिसांना कळविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित ठिकाणी पथक जाऊन तक्रारीची शहनिशा करणार आहे, असेही डॉ. माने यांनी सांगितले.

अजमेरा प्रभागात सर्वाधिक मतदार
पिंपरी : महापालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. पुरवणी याद्यांचे अद्ययावतीकरण झाले असून, प्रभागनिहाय याद्या फोडण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यात सर्वांत लहान प्रभाग क्रमांक २५ वाकड-ताथवडे, पुनावळे असून, सर्वांत मोठा प्रभाग क्रमांक नऊ अजमेरा कॉलनी, पिंपरी हा आहे.
महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर मतदारनोंदणी अभियान राबविण्यात आले होते. त्या वेळी नवमतदार मोठ्या प्रमाणावर नोंदविले गेले. महापालिका परिसरात एकूण मतदार १० लाख ८७ हजार १९८ असून, सुमारे एक लाख १६ हजार २५४ नवमतदार नोंदविले गेले. त्यामुळे मतदारांची संख्या १२ लाख ३ हजार ४५२ झाली आहे. मतदार जागृती अभियान आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केल्याने नोंदणी करण्यात आली. तसेच राजकीय पक्षांनाही मतदार नोंदणीसाठी आवाहन केले होते. त्यामुळे सुमारे दीड लाख मतदारांची भर पडली आहे.
प्रभागानुसार भाग मतदार याद्या फोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार गुरूवारी या याद्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाणार आहेत.
त्यात सर्वांत लहान प्रभाग वाकड, ताथवडे हा असून मतदारसंख्या २३ हजार ५९९ आहे. सर्वांत मोठा प्रभाग अजमेरा कॉलनी असून, मतदार संख्या ४८४१० आहे. त्यानंतर अंतिम यादी पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Code of Conduct Applicable; Runway of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.