थंडी मानवली कडधान्यांना
By admin | Published: March 3, 2017 01:35 AM2017-03-03T01:35:12+5:302017-03-03T01:35:12+5:30
कडधान्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश ढोरे यांनी सांगितले.
शिवणे : पवन मावळात दर वर्षीच्या तुलनेने या वर्षी जास्त पडलेल्या थंडीचा हरभरा, वाटाणा, मसूर, श्रावणी घेवडा, पावडा यांसारख्या कडधान्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश ढोरे यांनी सांगितले.
पवन मावळातील जवळजवळ ९० टक्के शेतकरी हा आपल्या शेतात बाराही महिने वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेत असतो. थंडीच्या कालावधीत येथील शेतकरी गहू, हरभरा, वाटाणा, मसूर, श्रावणी घेवडा, पावडा यांसारखे पिके घेत असतो. काही शेतकऱ्यांची हरभरा, वाटाणा आदी कडधान्य काढणीला आल्याने त्यांची मोठी लगबग चालू असल्याचे दिसत आहे. वाटाणा, हरभरा, मसूर पिके काढून त्यांना घराशेजारील अंगणात किंवा घरावरील पत्र्यावर वाळविण्यासाठी काही दिवस ठेवला जातो. आतील दाणे पूर्ण वाळल्याची खात्री केल्यानंतरच त्याची मळणी केली जात असल्याचे ढोरे यांनी सांगितले. ढोरे स्वत:, त्यांच्या पत्नी
मालनबाई आणि कुटुंबातील इतरांची सध्या मळणीनंतर उफणणीची लगबग सुरू आहे.
कडधान्यांना या थंडीचा चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी भाऊ विश्वनाथ ढोरे यांनी सांगितले. कडधान्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होत असल्याचे शेतकरी कुटुंबातील हिराबाई लोखंडे यांनी सांगितले.
मावळ तालुक्यात भाताचे भरघोस उत्पादन घेतले जात असले तरी ज्वारी, बाजरी, गहू या सारखी पीकेही शेतकरी घेतात. विशेषत: घरच्या वापरासाठी ही पीके घेणारे अनेक शेतकरी आहेत. वर्षभर लागणाऱ्या डाळींसाठी कडधान्ये पीकविण्यातही अनेक प्रयत्न
करतात. खरीप हंगामात
आंतरपीक म्हणून थोड्या प्रमाणात कडधान्य घेतली जातात. अलीकडे डाळी किंवा कडधान्याचे दर वाढल्याने नगदी पीक म्हणूनही या पीकाकडे पाहिले जात आहे. (वार्ताहर)