Corona Virus: सर्दी, खोकला, अंगदुखी हीदेखील कोरोनाची लक्षणे? बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:21 AM2022-07-06T11:21:42+5:302022-07-06T11:21:50+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या संथ गतीने वाढत आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या संथ गतीने वाढत आहे; परंतु पूर्वीच्या तुलनेत सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. या आधीच्या दोन्ही लाटांत वास न येणे, चव न लागणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, या प्रकारची लक्षणे दिसून येत होती; परंतु सद्य:स्थितीत आढळून येणाऱ्या रुग्णांना डोके दुखणे, अशक्तपणा येणे, अंग दुखणे, कोरडा कफ किंवा खोकला येणे, कफमुळे छातीत दुखणे, या प्रकरची लक्षणे आढळून येत असल्याची निरीक्षणे डॉक्टरांनी नोंदविली आहेत.
शहरात ६ जूनला १०५ सक्रिय रुग्ण होते. तेव्हा एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नव्हता. सर्व रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत होते. सद्य:स्थितीत ४ जुलैच्या आकडेवारीनुसार शहरात १२३९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ११८२ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत, तर ५७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
रुग्ण वाढ ही संथगतीने होत असली तरीदेखील नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण गेल्या वर्षी जानेवारीपर्यंत रुग्णांची संख्या कमी होती. त्यानंतर मार्च ते मे या कालावधीत रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२१ मध्ये ७० हजार २८५ तर मेमध्ये ३९ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्ण कमी झाल्याने काही महिन्यांपूर्वी सर्व निर्बंध हटविण्यात आले होते. तसेच मास्क घालणे ऐच्छिक करून दंड आकारणे बंद करण्यात आले होते. परिणामी, मास्क घालणे अनेकांनी बंद केल्याचे दिसून येत आहे. सार्वजिनक आणि गर्दीच्या ठिकाणीदेखील मास्क घालणे नागरिकांनी बंद केल्याचे दिसून येते.
वायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले ?
शहरात सध्या कधी पाऊस तर कधी गर्मीचे वातावरण आहे. परिणामी, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयासोबत खासगी रुग्णालयात ताप, सर्दी, अंगदुखीच्या रुग्णांची गर्दी होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात ताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.
''सर्दी, कफ, खोेकला, अंग दुखणे, या प्रकारची लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये सध्या आढळून येत आहेत. सध्या आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. परिणामी, बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत असल्याचे वायसीएमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले आहे.''