पिंपरी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 07:51 PM2020-10-24T19:51:23+5:302020-10-24T19:54:57+5:30
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या प्रवृत्तीवर घाव घालणे गरजेचे..
पिंपरी : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्न होऊन सर्वच घटकांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
कनेक्टिंग एनजीओच्या माध्यमातून शुक्रवारी वेबिनार घेण्यात आले. त्यावेळी कृष्ण प्रकाश बोलत होते. पिंपरी - चिंचवड सिटीझन फोरमच्या (पीसीसीएफ) माध्यमातून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, ‘‘शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या प्रवृत्तीवर घाव घालणे गरजेचे आहे. गुन्हेगारीची प्रवृत्ती संपली तर गुन्हेगारी आपोआप संपेल. पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप आणि पोलिसांच्या विविध उपक्रमातील पोलीस आणि डॉक्टर, समुपदेशक, समाजसेवक, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणले जाणार आहे. त्यातून नवीन संकल्पनांना बळ दिले जाणार आहे. ‘व्हिलेज डिफेन्स पार्टी’ ही संकल्पना मुंबई पोलिसांच्या मॅन्युअलमध्ये आहे. ती पिंपरी – चिंचवड शहरात राबवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे. शहरातील विविध वस्त्यांमधून बाल गुन्हेगार कसे तयार होतात त्याचे दाखले त्यांनी दिले. या मुलांवर संस्कार होऊन स्कील जॉब मिळावेत यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे. अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे आकर्षित होण्याचे प्रमाण त्यातून कमी होऊ शकते. त्यांना वेळीच मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे.’’
लक्ष्मीकांत भावसर यांनी प्रास्ताविक केले. अविनाश चिलेकर यांनी परिचय करून दिला. जेष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथीयान यांनी आभार मानले.
...........................
शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आराखड्याची गरज आहे. केवळ पोलिसांमुळे ते शक्य नसून सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सामाजिक संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड