महाविद्यालय ‘नॉटरिचेबल’, अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनागोंदीमुळे विद्यार्थी संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:58 AM2018-06-19T01:58:39+5:302018-06-19T01:58:39+5:30
दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर झाला. निकालापूर्वी पहिल्या टप्प्यात प्रवेश प्रक्रियेचा आॅनलाइन अर्ज विद्यार्थ्यांनी भरला आहे.
पिंपरी : दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर झाला. निकालापूर्वी पहिल्या टप्प्यात प्रवेश प्रक्रियेचा आॅनलाइन अर्ज विद्यार्थ्यांनी भरला आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, त्या महाविद्यालयांची नावे द्यायची आहेत. आॅनलाइन प्रवेशासाठी दीडशे रुपयांची पुस्तिका विद्यार्थ्यांनी खरेदी केली आहे. या पुस्तिकेच्या आधारे माहिती घेण्यासाठी संबंधितांना संपर्क साधला असता, योग्य प्रकारे प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे.
विद्यार्थ्याने ज्या शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्या शाळेला संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाऐवजी दुसºया महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर पहिल्या शाळेतून त्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्याच शाळेशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्याला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली जाते. वेळोवेळी विद्यार्थ्याला मोबाइलवर मेसेज पाठविले जातात, अन्यथा विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्याबाबतही उदासीनता दाखवली जाते. पुस्तिकेत संपर्कासाठी शिक्षकांची नावे, मोबाइल क्रमांक दिले आहेत. त्यातील काही मोबाइलवर तर चक्क ‘नॉट रिचेबल’ असे उत्तर ऐकण्यास मिळते. त्यामुळे नेमका संपर्क तरी कोणाशी साधायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवेशप्रक्रियेबाबत आकुर्डीत नुकतेच एक मार्गदर्शन शिबिर झाले. परंतु शहरातील हजारो विद्यार्थ्यांना एकाच वेळी या शिबिराला उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेकांना प्रवेशप्रक्रियेची नेमकी माहिती मिळू शकली नाही.