नवीन मतदारांमुळे लढतीत रंग
By admin | Published: February 12, 2017 05:14 AM2017-02-12T05:14:29+5:302017-02-12T05:14:29+5:30
संत तुकारामनगर प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे योगेश बहल आणि भाजपाचे यशवंत भोसले यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक २० मध्ये नव्याने काही
पिंपरी : संत तुकारामनगर प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे योगेश बहल आणि भाजपाचे यशवंत भोसले यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक २० मध्ये नव्याने काही परिसर समाविष्ट झाला आहे. बहल यांनी संत तुकारामनगर भागातून यापूर्वी निवडणूक लढविली आहे. मात्र, नव्याने जोडलेल्या भागातील मतदारांपर्यंत पोहाचणे त्यांनाही कठीण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले कामगार नेते यशवंत भोसले यांच्याशी त्यांची २० ड मध्ये लढत होत आहे. यशवंत भोसले हे कामगार नेते असल्याने या अटीतटीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रभाग क्रमांक नऊची मतदारसंख्या ४९ हजार ३०९ इतकी आहे. विशाल थिएटर, वैशालीनगर, कासारवाडीचा अग्रसेननगर, कुंदननगर, पार्श्वनाथ सोसायटी हा परिसर संत तुकारामनगर प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. लोकसंपर्क आणि नगरसेवक पदाचा अनुभव गाठीशी असला, तरी बहल यांना पूर्वीप्रमाणे सहज अशी निवडणूक राहिलेली नाही. या गटात शिवसेनेचे विजय कापसे, मनसेचे संजय यादव हेसुद्धा रिंगणात आहेत. त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होणार आहे.
प्रभाग पद्धत असल्याने पॅनेलमधील उमेदवारांना बरोबर घेऊन जाणे भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहल यांच्या पॅनलमध्ये ब गटातून श्याम लांडे, अ गटातून सुलक्षणा धर-शिलवंत, संगीता सुवर्णा हे उमेदवार आहेत.(प्रतिनिधी)
प्रभाग २० ‘अ’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा धर-शिलवंत,भाजपाच्या प्रियंका ननावरे,शिवसेनेच्या अनुराधा माने, काँग्रेसच्या मनाली मोरे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. ‘ब’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम लांडे, शिवसेनेचे राजेश वाबळे यांच्यात लढत होणार आहे, तर त्यांना काँग्रेसचे अमरसिंग नाणेकर, भाजपाचे कुणाल लांडगे टक्कर देत आहेत. ‘क’ गटात राष्ट्रवादीच्या संगीता सुवर्णा,भाजपाच्या सुजाता पलांडे आणि शिवसेनेच्या सुरेखा लांडगे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.