एसटीपेक्षा कमी पैशांत चला लातूर, पुणे, औरंगाबाद! बसस्थानकात एजंटांना खुले रान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:42 AM2022-12-19T11:42:13+5:302022-12-19T11:43:37+5:30
पुणे-औरंगाबाद प्रवासासाठी शिवनेरीचे तिकीट ७६५ रुपये आहे. मात्र, खासगी कारने एका प्रवाशाला अवघ्या ५२५ रुपयांमध्ये नेण्यास एजंट तयार झाला...
पिंपरी : दिवाळीमध्ये एसटीने गावी जाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तेव्हा ट्रॅव्हल्सचालकांनी देखील तिकीटदर दुप्पट करून प्रवाशांची लूट केली. आता ट्रॅव्हल्सला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे थेट एसटी स्टँडवर येऊन तसेच स्टँडच्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवाशांना कमी पैशात नेण्याचे आमिष एजंट दाखवताना दिसून येतात. वल्लभनगर आगाराजवळ एजंटने एसटीच्या तिकिटापेक्षा औरंगाबादसाठी २४० रुपये कमी सांगितले, तर नाशिकसाठी ५० रुपये एसटीच्या तिकिटापेक्षा कमी द्या असे सांगितल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या पाहणीत समोर आले.
बसस्थानकात एजंटांना खुले रान
वाकडेवाडी बस आगारात खासगी ट्रॅव्हल्सचे थेट प्रवेश करून खासगी ट्रॅव्हल्समध्ये जागा असून लातूर, औरंगाबाद येथे ट्रॅव्हल्स जात असल्याचे सांगत एसटीचे प्रवासी पळवत आहेत. शिवाय, एसटीला सुटण्यासाठी वेळ लागणार असून एसटी दहा ठिकाणी थांबत जाईल; पण ट्रॅव्हल्सने कमी दराने आणि वेळेच्या आधी पोहोचविण्याचे आवाहन हे एजंट करताना दिसून आले.
औरंंगाबादसाठी २४० रुपये कमी
पुणे-औरंगाबाद प्रवासासाठी शिवनेरीचे तिकीट ७६५ रुपये आहे. मात्र, खासगी कारने एका प्रवाशाला अवघ्या ५२५ रुपयांमध्ये नेण्यास एजंट तयार झाला. असे चार प्रवासी एसटी स्थानकातील जमवून त्या एजंटने त्यांना कारमध्ये बसवूनदेखील दिले, तर खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटने ६०० रुपयांमध्ये स्लीपर कोचने घेऊन जाऊ, असे सांगितले.
प्रवासी जेव्हा ट्रॅव्हल्स बुक करतात, तेव्हा त्यांनीदेखील गाडी आपल्यासाठी सुरक्षित आहे का? याची पाहणी करावी. गाडीत अग्निसुरक्षा यंत्रणा आहे का, लांबच्या पल्ल्यासाठी गाडीत एकच चालक आहे की दोन याची चौकशी ते करू शकतात. शिवाय काही ट्रॅव्हल्सबाबत ऑनलाइन देखील प्रवाशांनी माहिती दिलेली असती की त्यांच्या सुविधा चांगल्या आहेत की वाईट याची देखील माहिती प्रवाशांनी घ्यावी. कमी पैशात एजंट घेऊन जातात. मात्र, तुमच्या सुरक्षेची ते हमी देतात की नाही ते पाहणे महत्त्वाचे आहे.
- अमोल काळबांडे, प्रवासी