पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! रुग्णसंख्या कमी झाल्याने जंबो रुग्णालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 12:21 PM2021-09-23T12:21:14+5:302021-09-23T12:30:15+5:30
वायसीएममधील अतिदक्षता विभागातील रुग्णही कमी झाले आहेत. गणेशोत्सवानंतर कोरोनाचा आलेख काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे
पिंपरी: औद्योगिक नगरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी सुरू केलेले जंबो रुग्णालय बंद केले आहे. दाखल रुग्णांची संख्या चारशेंवर आली आहे. तसेच वायसीएममधील अतिदक्षता विभागातील रुग्णही कमी झाले आहेत. गणेशोत्सवानंतर कोरोनाचा आलेख काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.
तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी महापालिकेच्यावतीने नेहरूनगर येथे जंबो कोवीड रुग्णालय सुरू केले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने १५ सप्टेंबरपासून रुग्णालयातील कामाचा ठेका थांबविण्यात आला. त्यानंतर काही रुग्णांसाठी महापालिकेचे डॉक्टर आणि परिचारिका कर्मचारी दिले होते. त्यानंतर मंगळवारी शेवटच्या पेशंटला डिस्चार्ज दिला आहे. वायसीएमचे प्रमुख डॉ. राजेश वाबळे म्हणाले, ‘‘वायसीममधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गंभीर रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. सध्या आयसीयू एक आणि दोनमध्ये ३० रुग्ण दाखल आहेत.’’
शहर परिसरातील खासगी आणि शासकीय अशा विविध रुग्णालयांमध्ये ६ हजार ८६४ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी १६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३९३ वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आणि गंभीर आणि दाखल रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले आहे. १२७ जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ६८ हजार १२६ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ९६४ वर पोहोचली आहे.
लसीकरणचा वेग वाढला-
महापालिका परिसरात मागील आठवड्यात लसीकरण मंदावले होते. आज पुन्हा वाढले आहे. आहे. शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालये अशी २०२ केंद्र सुरू आहे. आज १९ हजार ८५४ जणांना लस देण्यात आली आहे. एकूण लसीकरण १८ लाख २१ हजार ४०७ वर पोहोचले आहे.