आयुक्त दिनेश वाघमारे लाचप्रकरणाचे सूत्रधार
By admin | Published: April 27, 2017 05:01 AM2017-04-27T05:01:18+5:302017-04-27T05:01:18+5:30
भय व भ्रष्टाचारापासून सर्वसामान्य जनतेची सुटका करून स्वच्छ, पारदर्शक कारभाराची हमी देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाचाही
पिंपरी : भय व भ्रष्टाचारापासून सर्वसामान्य जनतेची सुटका करून स्वच्छ, पारदर्शक कारभाराची हमी देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाचाही लाचप्रकरणात हात असल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील आयुक्त दिनेश वाघमारे हेच लाचप्रकरणातील खरे सूत्रधार आहेत. पोलिसांनी त्यांचा स्वीय सहायक शिर्के १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या मंगला कदम यांनी केला.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक व लघुलेखक शिर्के एका बांधकाम व्यावसायिकाकडून १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कदम यांनी केली.
त्या म्हणाल्या, ‘‘शहरात राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटणाऱ्या भाजपाने महापालिका निवडणुकांपासूनच अत्यंत नियोजनबद्धरीतीने स्वत:ची कार्यपद्धती राबवयाला सुरुवात केली होती. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी भाजपाला विजयी करण्यासाठी आपली सारी शक्ती, प्रतिष्ठा पणाला लावली होती. सर्वसामान्य जनतेला आपले गोंडस रूप दाखवून भुलवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. शिर्के यांच्या रूपाने भाजपाचा भ्रष्ट कारभारच चव्हाट्यावर आला आहे. ’’ (प्रतिनिधी)