पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे ‘ऑनफिल्ड’, पदयात्रा मार्गाची पाहणी करून घेतला आढावा
By नारायण बडगुजर | Published: January 24, 2024 09:25 PM2024-01-24T21:25:42+5:302024-01-24T21:25:52+5:30
पिंपरी : मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा काढली आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला ...
पिंपरी : मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा काढली आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बुधवारी दुपारनंतर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदयात्रेच्या मार्गावर पाहणी करून आढावा घेतला.
राज्यातील तसेच शहरातील नागरिक लाखाेंच्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे पदयात्रेच्या मार्गावर सांगवी फाटा, रक्षक सोसायटी चौक, जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा, डांगे चौक, चापेकर चौक, चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबामाळ चौक, निगडी, भक्ती-शक्ती चौक, देहूरोड, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात केला होता. बुधवारी सकाळी पदयात्रा शहरात सांगवी फाटा येथे दाखल होणार होती.
मात्र, विलंब झाल्याने सायंकाळपर्यंत पदयात्रा शहरात पोहचली नव्हती. असे असले तरी दुपारपासूनच पदयात्रेच्या मार्गावर मराठा समाजबांधवांची वाहने तसेच पादचारी मोठ्या संख्येने गर्दी करू लागले होते. तसेच पदयात्रेत सहभागी झालेल्यांसाठी पाणी, अल्पोपहार व जेवण वाटप करणाऱ्यांचीही माेठी गर्दी होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बुधवारी सकाळपासूनच खबरदारी घेण्यात आली.
दरम्यान, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दुपारनंतर पदयात्रा मार्गावरील चौकांमध्ये पाहणी करून आढावा घेतला. चोख बंदोबस्ताबाबत त्यांनी सूचना केल्या.
असा आहे बंदोबस्त...
अपर पोलिस आयुक्त एक, पोलिस उपायुक्त पाच, सहायक पोलिस आयुक्त आठ, पोलिस निरीक्षक ३७, सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक ११२, पोलिस अंमलदार ९७०, वार्डन १२१ असा बंदोबस्त पदयात्रेसाठी तैनात करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सांगवी फाटा ते तळेगाव दाभाडे दरम्यान पदयात्रेच्या मार्गावर हा बंदोबस्त आहे.