पोलीस आयुक्तालय बुधवारी होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:11 AM2018-08-13T02:11:36+5:302018-08-13T02:11:46+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. १५ आॅगस्टला पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त गाठला जाणार आहे.
पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. १५ आॅगस्टला पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त गाठला जाणार आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध विभाग सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चिंचवड पोलीस वसाहतीलगत महापालिकेने व्यायामशाळेसाठी बांधलेल्या इमारतीत ‘नियंत्रण कक्ष’ सुरू करण्यात येणार असल्याने त्या ठिकाणचे रंगरंगोटीचे काम नुकतेच करण्यात आले.
खंडणीविरोधी पथक, संघटित गुन्हेगारीविरोधी पथक, महिला सुरक्षा विभाग, आर्थिक गुन्हे शाखा असे विविध विभाग सुरू केले जाणार आहेत. त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्वतंत्र आयुक्तालयासाठी राज्य शासनाच्या गृहखात्याने महत्त्वाच्या आणि प्रमुख पदांच्या नियुक्ती केल्या आहेत. आर. के. पद्मनाभन यांची आयुक्तपदी, तर अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी मकरंद रानडे यांची निवड झाली आहे. नव्या पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस उपायुक्तपदी नम्रता पाटील व विनायक ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. सहायक पोलीस आयुक्तपदी चंद्रकांत अलसटवार आणि श्रीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्मार्तना पाटील यांनाही पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून नव्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील महापालिकेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या इमारतीत आयुक्तालय सुरू होणार आहे. निगडी येथील शाळेच्या इमारतीत मुख्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे. स्पाइन रस्ता येथील क्लब हाऊस या जागेत अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस उपायुक्त कार्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे. ग्रामीणमधील आणि शहरी भागातील मिळून एकूण १५ पोलीस ठाण्यांचा कारभार नव्या पोलीस आयुुक्तालय अखत्यारित केला जाणार आहे.
पुण्यातील सामाजिक सुरक्षा विभागातर्फे वेळोवेळी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाते. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या मुलींची सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अनेकदा सुटका केली आहे. शहर, ग्रामीण आणि रेल्वे पोलीस या तीन विभागांसाठी पुण्यात मानवी व्यापारविरोधी पथक कार्यरत आहे. पुण्यात मानवी व्यापारविरोधी पथक कार्यरत असले, तरी लवकरच शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालयांतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग सुरू केला जणार आहे. पिंपरी-चिंचवडसाठी असा स्वतंत्र विभाग कार्यान्वित होणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
स्थापत्यविषयक कामासाठी अल्पमुदतीची निविदा
१पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होणार आहे. नवीन पोलीस आयुक्तालयासाठी फर्निचर आणि स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी या कामाचा अर्थसंकल्पात नव्याने समावेश केला आहे. अर्थसंकल्पीय रक्कम चार कोटी ६४ लाख रुपये इतकी आणि निविदा रक्कम तीन कोटी ८७ लाख रुपये इतकी येत आहे. या कामासाठी सात दिवसांची अल्पमुदतीची निविदा काढली आहे.
२पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मंत्रिमंडळाच्या चार महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर
प्रशस्त जागा शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार चिंचवड - प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयास योग्य असून, ती इमारत भाड्याने द्यावी, असे पत्र पोलिसांनी ८ मे २०१८ रोजी महापालिकेला दिले होते. त्यानुसार या शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यास महापालिका सभेनेही मान्यता दिली. त्यानंतर युद्धपातळीवर आयुक्तालयाच्या या इमारतीचे काम सुरू आहे.
३पोलीस आयुक्तालय इमारतीसाठी स्थापत्यविषयक आणि फर्निचरची कामे करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची उपसूचना महापालिका सभेपुढे सादर करण्याची सूचना आयुक्तांनी दिली होती. ही उपसूचना महापालिका सभेपुढे सादर केली आहे. या उपसूचनेनुसार या कामासाठी अर्थसंकल्पीय रक्कम पाच कोटी
रुपये आणि अर्थसंकल्पीय तरतूद तीन कोटी रुपये होणार आहे.
४आयुक्तालयाची कामे महापालिकेच्या तीन इमारतींत करण्यात येणार आहेत. चिंचवड - प्रेमलोक पार्क येथील शाळेच्या इमारतीत आयुक्तालयाचे काम होणार असून, निगडीतील कै. अंकुशराव बोºहाडे विद्यालय आणि चिंचवड आरक्षण क्रमांक २११ मधील व्यापारी केंद्रातही इतर विभागांची कामे होणार आहेत. त्या दृष्टीने आयुक्तालयासाठी फर्निचर अणि आवश्यक स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी नकाशे तयार केले आहेत. या नकाशांना पोलीस आयुक्तांनी मान्यता दिली आहे. फर्निचरसाठी महापालिकेच्या वेबसाईटवर आॅनलाईन निविदा दर मागविले आहेत.