आयुक्तसाहेब, शहरातील अवैध धंदे कधी थांबविणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 03:54 PM2020-01-20T15:54:43+5:302020-01-20T16:09:24+5:30

 औद्योगिक, कामगारनगरीची बदनामी झाली तर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा 

Commissioner Sir, When will the Commissioner stop illegal businesses in the city? | आयुक्तसाहेब, शहरातील अवैध धंदे कधी थांबविणार ?

आयुक्तसाहेब, शहरातील अवैध धंदे कधी थांबविणार ?

Next
ठळक मुद्देसर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सवाल : पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतरही गुन्हेगारीचा आलेख झालेला नाही कमीजुगार, मटका, क्लब, हुक्का व बेकायदा मद्यविक्रीने येथील गुन्हेगारांना मिळते खतपाणी .

पिंपरी :  शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे थांबविण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना दीड वर्षांपूर्वी केली. त्यानंतरही गुन्हेगारी व अवैध धंदे कमी होण्याऐवजी वाढत असल्याने शहराची बदनामी होत आहे. पोलीस आयुक्तसाहेब, हे अवैध धंदे कधी थांबवितात हे पाहू, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 
शहराच्या औद्योगिक विकासामुळे नोकरी व व्यावसायासाठी महाराष्ट्रासह परराज्यांतील व परदेशातील नागरिक येथे स्थलांतरित झाले आहेत. त्याचबरोबर अनेक अवैध धंदे येथे सुरू झाले. जुगार, मटका, क्लब, हुक्का व बेकायदा मद्यविक्रीने येथील गुन्हेगारांना खतपाणी मिळते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत गेले.  राज्यात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड शहराचा गुन्हेगारीचा आलेख सर्वाधिक आहे. गुन्हेगारी रोखून शहर भयमुक्त करण्यासाठी  १५ आॅगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतरही गुन्हेगारी व अवैध धंदे कमी न झाल्याने शहर ‘भयमुक्त’ होईल, या  पिंपरी-चिंचवडकरांच्या आशेवर पाणी पडले आहे. 
.............
लोकमत’चे मानले आभार 
पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतरही गुन्हेगारीचा आलेख कमी झालेला नाही. उलट गुन्हेगारीला खतपाणी खालणारे अवैध धंदे वाढतच चालले आहेत. जुगार, मटका, क्लब, हुक्का, बेकायदा मद्यविक्री व वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे गैरप्रकार ‘लोकमत’ने ‘उद्योगनगरी होतेय अवैध धंद्यांचे आगार’ या वृत्तमालिका व स्टिंग ऑपरेशनद्वारे उजेडात आणले. त्यानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहरातील गैर धंदे उजेडात आणल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले. तसेच, पोलिसांनी अवैध धंद्ये तातडीने न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 
...............................................

गुन्हेगारी थांबविण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची सुरूवात झाली. त्यानंतरही गुन्हेगारी वाढतच आहेत. त्याविषयीची तक्रार राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे. अवैध धंद्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची बदनामी होणार असेल, तर स्थानिक पातळीवर भाजपा गप्प बसणार नाही. आम्ही रस्त्यांवर उतरू.- लक्ष्मण जगताप, आमदार, चिंचवड
...........
भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात गुन्हेगारी वाढली, हे सत्य नाकारता येणार नाही. आता नुकतेच महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सुरक्षिततेचे वातावरण मिळावे, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. गृहमंत्री आणि पालकमंत्री महाविकास आघाडीचेच आहेत. निश्चितच प्रश्न समजून घेऊन त्यानुसार कारवाई केली जाईल.- अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी..
.................
पोलीस आयुक्तालय सुरू झाले असले तरी मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. पोलिसांमध्ये गुन्हेगारी मोडून काढण्याची क्षमता आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी ते शक्य नाही. गुन्हेगारी कमी करण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य मोलाचे आहे. नागरिकांनी जागरूक रहायला हवे.- महेश लांडगे, आमदार, शहराध्यक्ष, भाजप.
.................
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना अवैैध धंद्यांना खतपाणी घातले नाही.  शहरातील बेकायदा धंदे बंद झालेच पाहिजेत, अशीच राष्ट्रवादीची भूमिका  आहे. गुन्हेगारीमुक्त शहर करण्यासाठी आयुक्तालयाची स्थापना केली. आयुक्तांनी  स्वत: लक्ष घालावे.- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
.............
शहरातील अवैैध धंदे बंद झाले पाहिजेत, शहरात आयुक्तालय झाले त्यावेळीच मटका, जुगार इत्यादी धंद्यांवर आळा बसायला हवा होता. पण यावर दोन वर्षांनंतरही आळा बसत नाही, हे पोलीस यंत्रणेचे अपयशच म्हणावे लागेल. यावर पोलिसांनी तातडीने पावले उचलून कडक कारवाईची अपेक्षा आहे.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस.
...........
पिंपरी-चिंचवड शहरात अवैैध धंदे खुलेआम सुरू असल्याने शहराची बदनामी होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अवैध धंदे तातडीने बंद करावेत. तसेच येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा. याविषयी आम्ही पोलीस प्रशासनासोबत पत्रव्यवहारही केला आहे. पण त्यास योग्य असे सहकार्य मिळाले नाही. - योगेश बाबर, शहरप्रमुख, शिवसेना..
..........
आयुक्तालय सुरू झाल्यानंतरही पोलीस प्रशासन सुस्तावले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. अवैध धंद्याचे पितळ उघडे पाडल्याबद्दल लोकमतच्या टीमचे आभार मानतो. पोलीस आयुक्त नवीन आल्यामुळे ते याविषयी काय पाऊले उचलतील हे पाहत आहोत. कारवाईसंदर्भात पत्रही दिलेले आहे.- सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे.
..............

Web Title: Commissioner Sir, When will the Commissioner stop illegal businesses in the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.