आयुक्त साहेब, मध्यरात्री शांतता भंग करणाऱ्यावर कारवाई कधी?
By विश्वास मोरे | Updated: January 22, 2025 16:32 IST2025-01-22T16:30:48+5:302025-01-22T16:32:24+5:30
रस्त्यांवर रात्रीच्या पार्ट्यांमुळे ध्वनिप्रदूषण : नियमांची पायमल्ली

आयुक्त साहेब, मध्यरात्री शांतता भंग करणाऱ्यावर कारवाई कधी?
पिंपरी : वाढदिवसाच्या निमित्ताने रात्री १२ वाजेच्या सुमारास शहरातील चौकांमध्ये टोळक्याने जमा होऊन फटाके वाजवून शहराची शांतता भंग करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणही होते. कसलीही भीती नसलेल्या टोळक्यांवर कारवाई होणार कधी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबाजवणी व्हावी यासाठी पर्यावरणवादी ॲड. विकास शिंदे यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.
पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये रात्रीच्या १२ वाजता धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. चौकात २५-३० तरुण टोळक्याने जमतात. जमिनीवर आणि आकाशात आवाज करणारे फटाके अर्धा-एक तास वाजवले जातात. आवाजाने शहरातील शांतता भंग होऊन मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषण होत आहे. लहान मुले, आजारी आणि वयस्करांसाठी हे सर्व घातक ठरत आहे.
प्रदूषणात पडतेय भर
सर्वोच्च व उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. रात्री १० नंतर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बाबी (स्पीकर, फटाके) रोखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत आहे. रात्रीच्या वेळी फटाके वाजायला लागल्यानंतर अनेक नागरिक ११२ या पोलिस कंट्रोल रूमला कॉल करतात. तेव्हा पोलिस येऊन फक्त या मुलांना त्या ठिकाणावरून जाण्यास सांगतात.
रात्रीच्या १२ वाजता साजरे होणारे वाढदिवस, त्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, शहरातील भंग होणारी शांतता, झुंडीने गोळा झाल्यामुळे रात्रीची वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत. शहरांमध्ये रात्रीच्या १० नंतर फटाके वाजवून वाढदिवस साजरे करण्यास बंदीचे आदेश काढावेत. दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. - ॲड. विकास शिंदे (पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते)