मतभेदामुळे समित्या लांबणीवर
By Admin | Published: March 17, 2017 02:12 AM2017-03-17T02:12:22+5:302017-03-17T02:12:22+5:30
महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत मागील आठवड्यात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेतच स्थायी समितीसह विशेष समित्यांचे सदस्य
पिंपरी : महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत मागील आठवड्यात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेतच स्थायी समितीसह विशेष समित्यांचे सदस्य आणि सभापती नियुक्त करण्याचे नियोजन होते. स्थायी समितीसाठी चिंचवडच्या गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, महत्त्वाच्या विषय समित्यांचे सभापती आणि सदस्यपद कोणत्या गटास द्यायचे, याबाबत भाजपातील नेत्यांत एकमत नसल्याने सभापती निवड रखडली आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून पहिल्या सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौर निवड करण्यात आली. या संदर्भातील विषयपत्रिकेवर स्थायी समिती, महिला व बालकल्याण, क्रीडा, विधी समिती अशा विविध समितीचे सदस्य आणि सभापती निवडीचाही कार्यक्रम होता. मात्र, एकमत नसल्याने ही सभा २३ मार्चपर्यंत तहकूब ठेवली आहे.
महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आली असली, तरी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, अॅड. सचिन पटवर्धन, आझम पानसरे असे प्रमुख गट असून गडकरी, मुंडे असे जुने गटही कार्यरत आहेत. महापौर आणि उपमहापौर निवडीत पक्षात नव्याने दाखल झालेल्यांना संधी दिली. त्यामुळे स्थायी समिती, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा, विधी समिती अशा विषय समिती सभापतिपदी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी जुन्या गटांनी केली आहे. स्थायी समिती सभापतिपद चिंचवडकरांना मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. (प्रतिनिधी)