सीसीटीव्हीच्या कामाला गती देण्यासाठी समिती
By admin | Published: June 9, 2015 05:34 AM2015-06-09T05:34:26+5:302015-06-09T05:34:26+5:30
शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला विलंब होत असल्याने त्यातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यासाठी गृहविभागाकडून तांत्रिक समितीचे गठण करण्यात आले आहे.
पिंपरी : शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला विलंब होत असल्याने त्यातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यासाठी गृहविभागाकडून तांत्रिक समितीचे गठण करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पोलीस उपायुक्त, शासनाच्या आयटी विभागाचे अधिकारी, एमआरएससीचे प्रतिनिधी, एनआयसीचे प्रतिनिधी, महापालिकेच्या आयटी विभागाचा प्रतिनिधी, सीईओपीचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.
जर्मन बेकरीमध्ये २०१० मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यानंतर जंगली महाराज रस्ता, फरासखाना येथे झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर सीसीटीव्हीचा विषय पुन्हा चर्चेत आला होता. मात्र निविदा प्रक्रिया अनेक दिवस रखडल्याने सीसीटीव्हीचे काम सुरू होण्यास विलंब झाला होता. राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये तांत्रिक समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गृह विभागाच्या नियंत्रणाखाली सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये सीसीटीव्हीचे नियंत्रण कक्ष असणार आहे. तेथून शहरातील महत्त्वाच्या चौकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. शहरामध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत; मात्र अद्यापही सीसीटीव्हीचे काम मोठ्या प्रमाणात बाकी आहे. निधी तसेच इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीचे गठणही करण्यात आले. (प्रतिनिधी)
सीसीटीव्हीचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना मदत होऊ शकणार आहे. पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बसून संपूर्ण शहरावर एकाच वेळी लक्ष ठेवता येऊ शकणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना मोठी मदत होणार आहे.