भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, आरोग्य विभागाचा निषेध : आकुर्डीत माकपतर्फे भर पावसात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 08:44 PM2020-08-20T20:44:44+5:302020-08-20T20:47:07+5:30
जिजामाता रुग्णालयात कोरोना रुग्णांना निकृष्ट आहार दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करावी..
पिंपरी : कोरोना महामारीमुळे शहरातील सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र कोरोनाच्या नावाखाली महापालिका व शासनाच्या तिजोरीची लुटमार होत आहे. आरोग्य विभागाचा भ्रष्ट कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोप करून अशा कारभाराच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर समितीतर्फे गुरुवारी आकुर्डी येथे निदर्शने करण्यात आली. रुग्ण सेवेचा दर्जा सुधारून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करून आंदोलकांनी भर पावसात घोषणाबाजी केली.
पक्षाच्या शहर समितीचे क्रांतीकुमार कडुलकर, गणेश दराडे, अपर्णा दराडे, स्वप्निल जेवळे, सचिन देसाई, कुणाल म्हेत्रे, संजय म्हेत्रे, सुरेश बाबू, रंजीता लाटकर, अविनाश लाटकर, किसान शेवते, संजय ओहोळ, एकनाथ साळवी,संतोष गायकवाड,विनोद चव्हाण,सुषमा इंगोले आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
तात्पुरत्या जम्बो रुग्णालयाऐवजी कायम स्वरूपी संसंर्गजन्य रुग्णालय उभारण्यात यावे. जिजामाता रुग्णालय किंवा नवीन भोसरी रुग्णालय कायमस्वरूपी संसंर्गजन्य रुग्णालय म्हणून जाहीर करावे. वायसीएम रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील महापालिकेच्या डॅशबोर्डवर भागिदारीतील खासगी रुग्णालयातील रुग्णांची आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, महापालिकेच्या प्रत्येक दवाखान्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट दररोज उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक वार्डात अँटिजेंन आणि आरटीपीसीआर टेस्टसाठी स्वतंत्र सेंटर स्थापित करावे. रुग्ण सेवेसाठी कायमस्वरूपी डॉक्टर, परिचारिका, वार्ड बॉय यांची नेमणूक करून कंत्राटी पद्धत बंद करावी, जिजामाता रुग्णालयात कोरोना रुग्णांना निकृष्ट आहार दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करावी. सरासरी २५० रुपये प्रति रुग्ण खर्च करूनही निकृष्ट जेवण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधित ठेकेदारांच्या संस्थांची नावे स्मार्ट सारथीवर जाहीर करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यवसायांवरील निर्बंध हटविण्याची मागणी
आकुर्डीतील खंडोबामाळ चौकात आंदोलकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन भर पावसात निदर्शने करून आंदोलन केले. शहरातील हातगाडी, पथारी व्यावसायिक तसेच पोळीभाजी सेंटर इत्यादी सेवा व्यवसायांवरील निर्बंध हटवा, घरकामगारावरील अघोषित निर्बंध टाकलेल्या शहरातील सर्व सोसायटीच्या व्यवस्थापन समित्यांना निर्बंध हटवण्याचे अधिकृत आदेश द्यावेत. शिक्षण शुल्क सक्ती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.