खोट्या अकाउंटबाबत कंपनीही जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:53 AM2017-07-24T02:53:09+5:302017-07-24T02:53:09+5:30
राजकारण किंवा चित्रपटसृष्टीमधील नामवंतांना किंवा नेटसॅव्ही युवतींना बनावट फेसबुक, टिष्ट्वटर अकाऊंट किंवा तत्सम खात्यांमुळे वाढती डोकेदुखी झाली असून अशा बनावट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजकारण किंवा चित्रपटसृष्टीमधील नामवंतांना किंवा नेटसॅव्ही युवतींना बनावट फेसबुक, टिष्ट्वटर अकाऊंट किंवा तत्सम खात्यांमुळे वाढती डोकेदुखी झाली असून अशा बनावट अकाऊंटबद्दल तक्रार केल्यानंतर सेवा पुरवठादार मध्यस्थांनी (इंटरमिडीअरी) असे खाते ३६ तासांमध्ये बंद करणे आवश्यक आहे, असे सायबर कायद्यातील तज्ज्ञांचे मत आहे. पोलीसही असे खाते किंवा प्रोफाईल बंद करण्याबाबत काढून टाकण्याबाबत कारवाई करू शकतात.
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर भाजपानेते गिरीश बापट यांचे बनावट खाते उघडून त्यावर आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्या प्रकरणी ॠतुराज नलावडे (जुन्नर) या तरुणास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. माध्यम सल्लागार सुनील माने यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटवर उघडले जाणारे बनावट खाते हा विषय ऐरणीवर आला आहे.
नलावडे याने १५ जणांचे बनावट खाते उघडल्याचे तसेच काल्पनिक महिलांच्या नावे खाते उघडल्याचे सायबर क्राईम शाखेच्या पोलिसांना समजले आहे.
मध्यंतरी सायबर क्राईम शाखेने राजस्थानमधील २७ वर्षीय युवकाला बनावट खाते उघडल्याबद्दल अटक केली. पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या नावे त्याने खाते उघडून ती वेश्याव्यवसाय करीत असल्याचे भासविले होते.
एमबीएमध्ये शिकणाऱ्या युवतीचे बनावट खाते उघडून त्यावर तिचा संपर्क क्रमांक देणाऱ्या सायबर ठगावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माहिती प्रसारित करणे, साठवून ठेवणे आणि माहिती घेणे किंवा तत्सम सेवा देणे याबाबत माहिती प्रसारण क्षेत्रातील सेवा पुरवठादार व्यक्ती किंवा संस्था काम करीत असेल तर तिला मध्यस्थ (इंटरमिडीअरी) अशी संज्ञा आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही मध्यस्थाने घातक, आक्षेपार्ह, अज्ञानवयीनांवर परिणाम करू शकेल असे किंवा बेकायदेशीर मजकूर किंवा चित्र, छायाचित्र प्रसारित होऊ नये, यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सायबरतज्ज्ञांचे मत आहे.
अश्लील छायाचित्रे गुन्हा
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ कलमानुसार अश्लील छायाचित्रे प्रदर्शित करणे हा गुन्हा असून ज्यांच्या नावे अशा प्रकारे बनावट खाते उघडले गेले आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे बनावट खाते किंवा त्यावरील मजकूर बंद करण्याबाबत, काढून टाकण्याबाबत पोलीस पावले उचलू शकतात, असे सायबरतज्ज्ञांचे मत आहे.
कोणत्याही व्यक्तीच्या खासगीपणामध्ये प्रवेश करणे, त्याच्या नावे बनावट खाते उघडणे, त्याला असलेल्या व्यक्तिमत्त्वाबाबत फसवणूक करणे आणि ओळख चोरी करणे असे प्रकार सायबर कायद्यानुसार स्पष्टपणे गुन्हा ठरतो.