बेकायदेशीरपणे गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री प्रकरणी एका कंपनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 06:54 PM2021-07-06T18:54:59+5:302021-07-06T18:57:40+5:30
गुजरात येथील एका कंपनी चालकाने ॲमेझॉन या ऑनलाइन पोर्टल द्वारे गर्भपाताची औषधे विक्री केली
पिंपरी : गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बेकायदेशीरपणे ऑनलाईन माध्यमातून विक्री केल्याप्रकरणी गुजरात येथील एका कंपनी चालकाच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औषध निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी याबाबत वाकड पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आर के मेडिसिन, ए/६१, परिसीमा कॉम्प्लेट, सी जी रोड नवरंगापुरा, गुजरात याचे चालक नामे पिंटू कुमार प्रवीणचंद्र शहा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिली जात नाहीत. तरीदेखील बेकायदेशीरपणे आरोपीने ही औषधे ऑनलाइन माध्यमातून विकली. विवेक मल्हारी तापकीर यांनी ॲमेझॉन या ऑनलाइन पोर्टल द्वारे गर्भपाताची औषधे ३१ मे रोजी मागवली. त्यांना आरोपीच्या कंपनीची औषधे ४ जून रोजी मिळाली.
त्यानंतर तापकीर यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुण्याचे सहआयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याबाबत फिर्यादी अन्न निरीक्षक आणि अन्न निरीक्षक विवेक खेडकर यांनी गुजरात येथे जाऊन या प्रकरणाची चौकशी केली असता आरोपी दोषी आढळला. त्यानुसार याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.