भोसरी एमआयडीसीत ऑक्सिजनचा औद्योगिक वापर केल्याने कंपनी ‘सील’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 04:59 PM2021-05-15T16:59:15+5:302021-05-15T17:00:20+5:30
महसूल विभागाकडून शनिवारी (दि. १५) कंपनीवर कारवाई
पिंपरी : ऑक्सिजनचा औद्योगिक वापर केल्याने भोसरी येथील आकार आकार लेझर इंडस्ट्रिज ही कंपनी ‘सील’ करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून शनिवारी (दि. १५) ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, भोसरीचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, राज्याच्या उद्योग विभागाचे पुणे येथील सहसंचालक सदाशिव सुरवसे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होण्यासाठी ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही भोसरी येथील आकार लेझर इंडस्ट्रिज या कंपनीमध्ये आँक्सिजनचा औद्योगिक वापर होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संयुक्त पथकाने पाहणी केली. कंपनीत ऑक्सिजनच्या दोन सिलेंडरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. ते दोन्ही सिलेंडर तसेच कंपनी ‘सील’ करण्यात आली.
भोसरी एमआयडीसीतील जे ब्लाॅक येथील सुपर टेक या कंपनीतही ऑक्सिजनचे तीन सिलेंडर मिळून आले. त्यातील दोन सिलेंडर रिक्त होते तर एका सिलेंडमध्ये ऑक्सिजन होता. ते तीनही सिलेंडर सील करण्यात आले असून, उद्योग विभागाने जप्त केले आहेत.